आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये घातक मांजामुळे पतंगांचा पेच अन् काट उठलाय जिवावर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- पतंग आणि मकर संक्रांतीचे अतूट असे नाते आहे. या पर्वावर पतंगोत्सवाचा आनंद शिगेला पोहोचलेला असतो. डीजेच्या तालावर ‘ओ काट..,’ ‘ढील दे,’ ‘पेच टाक’ म्हणत आबालवृद्ध पतंग उडवण्याचा मनस्वी आनंद लुटतात. मात्र, काहींचा हा क्षणिक आनंद आणि उत्साह अनेकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे.

अलीकडे बारीक केलेली काच व सिरका यांच्यापासून बनवलेला धारदार मांजा, नायलॉन मांजा पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येतो. असल्या मांजामुळे पतंगाचा पेच आणि काटाकाटीचा हा खेळ दुचाकीस्वार, पादचारी आणि पक्ष्यांसाठी मात्र जीवघेणा ठरत आहे. झाडाझुडपांमध्ये अडकलेला मांजा नंतर कित्येक दिवस पक्ष्यांच्या जिवावर उठतो, याची या पतंगबाजांना कदाचित कल्पनाही नसते. विद्युत तारांमध्ये अडकलेला मांजाही जणू बळीचीच वाट बघत असतो. कटलेल्या पतंगाच्या मागे धावताना आणि गच्चीवर पतंग उडवताना भान हरपल्यामुळे होणार्‍या अपघातांच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. या मुद्दय़ावरही विरोधाभास कायम असून, यासाठी खाजगी नोकरी करणार्‍या कित्येक पतंगशौकिनांनी पतंगोत्सव साजरा करण्यासाठी कार्यालयात सुट्या टाकल्या, तर काहींनी दुष्परिणामांची जाण ठेवून कडाडून विरोधही केला.

चिनी मांजा घातकच
सुती धाग्याला काच व सिरक्याने घोटून त्याचा वापर पूर्वी मांजा म्हणून केला जायचा. आता तयार मिळणारा नायलॉन आणि चिनी बनावटीचा मांजा घातक ठरू लागला आहे.

प्रयत्न आले कामी
शहरातील पतंगोत्सवादरम्यान मांजामुळे जखमी पशू-पक्ष्यांवर वेळीच उपचार करण्यासाठी वाइल्ड लाइफ अँड एन्व्हायर्नमेंट कंझव्र्हेशन सोसायटीचे अनेक कार्यकर्ते दिवसभर प्रत्नरत होते.

‘पेटा’कडून देशभर होतेय जनजागृती
दिल्ली येथील ‘पेटा’च्या मानसी रावल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, गुजरात आणि चेन्नईमध्ये मांजावर पूर्णपणे बंदी आहे. निवासी भागामध्ये वापरल्यास तो अजामीनपात्र गुन्हा ठरतो. त्यावर कायद्याने शिक्षा होऊ शकते. ‘पेटा’ देशभरात मांजावर संपूर्ण बंदी आणण्यासाठी प्रयत्नरत आहे.

बंदी धुडकावून विक्री
शासनाने नायलॉन मांजावर बंदी घातल्यांतरही तो खुलेआम विकला जात आहे. ‘पेटा’तर्फे मांजावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, काइट अँड अँक्सेसरीज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनने ही बंदी धुडकावून लावत सरकारला नमते घ्यायला लावले. याबद्दल पक्षिप्रेमींनी संताप व्यक्त केला.

मकर संक्रांतीच्या पर्वावर शहरातील दुकानांमध्ये विविध रंग, आकारांची पतंग आणि चिनी मांजाही विक्रीसाठी उपलब्ध होता.

पक्ष्यांसाठी जीवघेणा
पालकांनी मुलांचा हट्ट पूर्ण करताना त्यांना मांजाचे दोषही समजावून द्यायला हवेत. मनीष निंबर्ते, हार्डवेअर इंजिनिअर.

पतंगोत्सवासाठी सुटी
वर्षातून एकदाच मिळणार्‍या या संधीसाठी कार्यालयातून सुटी घेतली आहे. डीजेच्या तालावर दिवसभर आकाशात मनमुराद पतंग उडवण्याचा यथेच्छ आनंद घेणार आहे. संतोष मोहोड, अभियंता.

सजग होणे आवश्यक
पतंगाचा मांजा वर्षभर पशू-पक्ष्यांसाठी धोकादायक ठरते. यावर बंदी यायलाच हवी. डॉ. जयंत वडतकर, पक्षिमित्र.