आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रक्षेपणात ‘कृषी वसंत’ कोमेजला, कृषी प्रदर्शनाच्या वेबकास्टिंगची यंत्रणा कोलमडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणारे ‘कृषी वसंत 2014’ राष्ट्रीय प्रदर्शन तंत्रज्ञानातील मागासलेपणा व कृषी विभागाच्या अनास्थेमुळे शेतकर्‍यांपर्यंत पोहोचू शकले नाही. तांत्रिक अडचणींमुळे वेबकास्टिंगच्या माध्यमातून केलेली थेट प्रक्षेपणाची सोय कुचकामी ठरल्याने बाजार समितीतील शेतकर्‍यांसाठी ‘कृषी वसंत’ पार कोमेजून गेल्याचे चित्र सोमवारी (दि. 10) दिसून आले. यामुळे शेतकर्‍यांसाठी ठेवलेल्या खुर्च्या दिवसभर रिकाम्याच दिसून आल्या. जिल्ह्यातील इतर भागांतही थेट प्रक्षेपणाला शेतकर्‍यांनी पाठ दाखवल्याचे चित्र होते.


हरितक्रांतीचे प्रणते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक जन्मशताब्दीनिमित्त नागपूर येथे नऊ ते 13 फेब्रुवारीदरम्यान ‘कृषी वसंत 2014’ या भव्य राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तंत्रज्ञानाची माहिती शेतकर्‍यांना व्हावी, या हेतूने जिल्ह्यातून साडेसहा हजारांवर शेतकर्‍यांना शासकीय खर्चातून प्रदर्शनस्थळी नेण्यात आले. ज्या शेतकर्‍यांना प्रदर्शनात जाता येणे शक्य नाही, अशांसाठी कृषी विभागाच्या सहकार्याने बाजार समित्या, तहसील कार्यालये, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पंचायत समिती या ठिकाणी वेबकास्टिंगच्या माध्यमातून थेट प्रक्षेपणाची सोय करून देण्यात आली आहे. येथील बाजार समितीतील सभागृहात थेट प्रक्षेपणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी ‘पीडीएस स्क्रीन’, प्रोजेक्टर, दोन लॅपटॉप उपलब्ध करून दिले आहेत. रविवारी (दि. 9) उदघाटनीय कार्यक्रम व्यवस्थित दिसला, असे उपस्थित कृषी विभागाच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे; परंतु दुपारी 12 वाजतापासून चार वाजेपर्यंत प्रक्षेपण व्यवस्थित दिसू शकत नव्हते. दरम्यान, सोमवारीही दिवसभर हिच परिस्थिती होती. त्यामुळे या ‘टेली’प्रदर्शनीसाठी ठेवलेल्या खुच्र्या दिवसभर रिकाम्याच होत्या.


कर्मचार्‍यांची नाव नोंदवण्यासाठी धडपड
बाजार समितीच्या सभागृहात थेट प्रक्षेपण धड दिसत नसताना एका महिला कर्मचार्‍याची मात्र आलेल्या प्रत्येकाचे नाव व सही घेण्यावर भर दिसून येत होता. त्यामुळे नोंदणी रजिस्टरवर प्रक्षेपणाला भेट देणार्‍या तब्बल 73 शेतकर्‍यांच्या सह्या दिसून आल्या; परंतु आज दिवसभर प्रक्षेपणच व्यवस्थित नसल्यामुळे या 73 शेतकर्‍यांनी नेमके काय पाहिले, हे शोधणे कौतुकाचा विषय ठरेल.


पडद्यावर काय दिसत होते?
प्रदर्शनाच्या थेट प्रक्षेपणासाठी वापरण्यात आलेल्या पडद्यावर सलग कोणताच कार्यक्रम दिसत नव्हता. वारंवार प्रक्षेपणात अडथळे येत होते. चर्चासत्राचे प्रक्षेपण सुरू असताना आवाज वेगळ्या कार्यक्रमाचा, तर प्रक्षेपण भलतेच असे दिसून येत होते. त्यातही सलगतेचा अभाव दिसत होता. दर दोन-तीन मिनिटांनी पडद्यावरील चित्र ‘हँग’ होत असे. चित्रही सुस्पष्ट दिसत नसल्यामुळे आपण नेमके काय पाहत आहोत, याचा अंदाज दिवसभर आला नाही.


दाखवल्या गुगलवरील ‘क्लिप’
रविवारी राष्ट्रपतींच्या भाषणानंतर थेट काहीच दिसत नसल्यामुळे उपस्थित एका अधिकार्‍याने तेथील कर्मचार्‍याला गुगलवरून शेतीशी संबंधित ‘क्लिप’ दाखवण्यासाठी सांगितले. दरम्यान, आजही थेट प्रक्षेपणात अडचणी असल्यामुळे यू ट्यूबच्या माध्यमातून पॉलिहाऊसच्या बांधकामाची ‘क्लिप’ दाखवणे सुरू होते. दरम्यान, संबंधित कर्मचार्‍याला प्रदर्शनाचे थेट प्रक्षेपण नाही का, अशी विचारणा केली असता, तो म्हणाला, तेच तर सुरू आहे. त्यानंतर त्याला ती यू ट्यूबवरील ‘क्लीप’ असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर तो ताडकन उठून लॅपटॉपवरील ‘क्लिप’ बंद करण्यासाठी गेला.


तिकडूनच ‘प्रॉब्लेम’ आहे!
प्रदर्शनाचे थेट प्रक्षेपण चांगल्या प्रकारे दिसत नसल्यामुळे उपस्थित कृषी विभागाच्या कर्मचार्‍यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, तिकडूनच ‘प्रॉब्लेम’ आहे, त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही.


शुभसंदेश गेले उडत!
वेबकास्टिंगच्या माध्यमातून 50 लाख शेतकर्‍यांपर्यंत प्रदर्शन पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृ ष्ण विखे पाटील, वैद्यकीय शिक्षण व फलोत्पादन मंत्री डॉ. विजयकुमार गावीत आदी नेत्यांनी वेबकास्टिंगच्या माध्यमातून प्रदर्शनाचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा व त्यांच्यापर्यंत प्रदर्शन कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी पोहोचवावे, असे आवाहन केले होते; परंतु वेबकास्टिंग फसल्यामुळे शुभसंदेशही उडत गेले.


14 ठिकाणी प्रक्षेपणाची सोय
आठ बाजार समित्या, चार तहसील कार्यालये, एक तालुका कृषी कार्यालय व एका पंचायत समितीत सोय होती; परंतु संपूर्ण जिल्ह्यातच चर्चासत्र वगळता प्रदर्शन दिसत नसल्यामुळे शेतकर्‍यांनी पाठ दाखवली. रविवारी 495 शेतकर्‍यांनी लाभ घेतल्याचे ‘आकडे’ कृषी विभागाकडे नोंद होते.


पडद्यावर काय दिसत होते?
प्रदर्शनाच्या थेट प्रक्षेपणासाठी वापरण्यात आलेल्या पडद्यावर सलग कोणताच कार्यक्रम दिसत नव्हता. वारंवार प्रक्षेपणात अडथळे येत होते. चर्चासत्राचे प्रक्षेपण सुरू असताना आवाज वेगळ्या कार्यक्रमाचा, तर प्रक्षेपण भलतेच असे दिसून येत होते. त्यातही सलगतेचा अभाव दिसत होता. दर दोन-तीन मिनिटांनी पडद्यावरील चित्र ‘हँग’ होत असे. चित्रही सुस्पष्ट दिसत नसल्यामुळे आपण नेमके काय पाहत आहोत, याचा अंदाज दिवसभर आला नाही.