आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांपासून वसतिगृह महिला अधीक्षकांविनाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिवरी (यवतमाळ)- हिवरी येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहावर मागील तीन वर्षांपासून महिला अधीक्षकांची नेमणूक करण्यात आली नाही. यामुळे वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे; तसेच त्यांना अनेक अडचणींचा सामनादेखील करावा लागत आहे.

पालकांनी या संदर्भात वारंवार तक्रारी केल्या. मात्र, पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही. आता येथील जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेने एल्गार पुकारला असून, वसतिगृहावर तत्काळ महिला अधीक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.
हिवरी येथे शासकीय बेसिक आश्रमशाळा असून शंभरच्या वर मुलींचे येथे वास्तव्य आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील मुली वसतिगृहात राहत असून, महिला अधीक्षकांविना त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुलींच्या पालकांनी वसतिगृहावर महिला अधीक्षक देण्यासाठी वारंवार तक्रारी केल्या. मात्र, तरीही मागणी पूर्ण करण्यात आली नसलल्याची पालकांची तक्रार आहे. एवढेच नाही, तर अधीक्षकांअभावी मुलींच्या अडीअडचणीसुद्धा सोडवल्या जात नाहीत. मुलींना कुठल्याही अडचणी आल्या, तर त्यांनी सांगायचे कुणाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पांढरकवडा येथील प्रकल्प अधिका-यांना याबाबत माहिती असूनदेखील अद्यापपर्यंत याबाबत पावले उचलण्यात आली नाहीत.

आदिवासी विद्यार्थिनींना चांगले शिक्षण व चांगले राहणीमान देण्यात यावे, या उद्देशाने सुरू असलेल्या या वसतिगृहात मुलींना कुठल्याच सुविधा पुरवल्या जात नाहीत. विद्यार्थिनींना वेळेवर पुस्तके नाहीत, गणवेश नाहीत, एवढेच नव्हे, तर रोज लागणा-या उपयोगी वस्तूसुद्धा पुरवल्या जात नाहीत. येथील विद्यार्थिनींनी या समस्या सांगायच्या कुणाकडे, हा प्रश्न आहे. महिला अधीक्षक नसल्याने किशोरवयीन मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक दिवस त्यांना भीतीच्या वातावरणात घालवावा लागत आहे. या विरोधात जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेने एल्गार पुकारला असून, तत्काळ आश्रमशाळेवर महिला अधीक्षक नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.