अमरावती- मागीलअडीच वर्षांपासून वेतन नसल्याने भू-विकास बँक कर्मचा-यांनी आगामी विधानसभा निवडणुकीवर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या या कर्मचाऱ्यांपुढे मतदानावर बहिष्काराशिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये भू-विकास बँकेच्या शाखा असून, कर्मचारी वर्गदेखील मोठा आहे. मागील काही वर्षांपासून भूविकास बँक कर्जाची वसुली नसल्याने ती अवसायनात निघाली.
शेतक-यांच्या कर्जाची रक्कम केंद्र शासनाकडून माफ करण्यात आली, त्यापोटी बँकेच्या मुंबई येथील शिखर शाखेला तब्बल १६०० कोटी रुपये मिळाले; मात्र ती रक्कम शिखर बँकेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनावर मागील अनेक वर्षांपासून खर्च केली जात आहे. शिखर बँकेकडे पैसा असतानादेखील जिल्हा शाखेतील कर्मचा-यांना वेतन दिले जात नसल्याचे वास्तव आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील भू-विकास बँक कर्मचाऱ्यांचे वेतनाअभावी मोठे हाल होत असल्याचे चित्र आहे.
आर्थिक संकटात असलेल्या जिल्ह्याच्या सावरखेड येथील राजेंद्र काळबांडे या कर्मचाऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. वेतनाअभावी राज्यातील एक हजाराच्या संख्येत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे भवितव्य अधांतरी आहे. मुलांचे शिक्षण, कुटुंबाचे पालनपोषण, समारंभ यांकरिता मोठी अडचण निर्माण झाली आहे. भू-विकास कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष एम. पी. पाटील (मुंबई), एस. ई. पाटील (धुळे), संजय महल्ले, रवी विधाते, विलास देशमुख, विलास डवरे (सर्व रा. अमरावती), रवी धांदे (नागपूर) आदींनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सावरखेड प्रकरणात प्रगती नाही:
आर्थिकविवंचनेत असलेल्या सावरखेड येथील राजेंद्र काळबांडे या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. घराचे बांधकाम मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्याकडून पीएफ मधील पैशांची मागणी करण्यात आली होती. मात्र, रक्कम नाकारण्यात आल्याने काळबांडे यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली. शिरखेड पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. मात्र, अद्यापही या प्रकरणात प्रगती नसल्याचे दिसून येत आहे. प्रकरण दडपण्याचा प्रकार पोलिसांकडून होत असल्याचे निदर्शनास येत आहे.