अमरावती - एसीबीने शुक्रवारी आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त वाळिंबे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पराडकर यांना लाच घेताना अटक केली. आता या ‘साहेबांना’ जामीन मिळावा, यासाठी दोन्ही साहेबांचे हितचिंतक शनिवारी सकाळपासून धडपड करत होते. जिल्हा परिषदेच्या आवारात तर यासाठी अधिकच तयारी सुरू असल्याचे दिसून आले.
आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त भास्कर वाळिंबे यांना भेटण्यासाठी शनिवारी सकाळीच काही जण एसीबी कार्यालयाच्या आवारात पोहोचले होते. यांपैकी हितचिंतक आतमध्ये येऊन वाळिंबे साहेबांची भेट घेण्याची तयारी करत होते, तर काही ‘पुढील’ नियोजनासाठी प्रयत्न करत होते.
आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक रविवारी (दि. 20) जिल्हा दौर्यावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे शनिवारी सकाळी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आले होते. आरोग्य विभागाचे काही अधिकारी डॉ. लव्हाळे यांच्यासोबत कक्षात बसले होते. याच वेळी डॉ. पराडकरांचे हितचिंतक त्यांच्या जामिनासाठी धडपड करत होते. जामिनासाठी काय काय आवश्यक आहे, ते पटापट गोळा करा, टॅक्स भरला असेल तर टॅक्स पावतीसुद्धा चालेल, अशी चर्चा आरोग्य विभागाच्या आवारात सुरू होती. एकंदरित मोठे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याचीच चर्चा सर्वत्र सुरू होती.
अप्पर आयुक्त आदिवासी कार्यालयात तर सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. कर्मचारी, अधिकारी कार्यालयात होते; मात्र कार्यालय परिसरात शांतता दिसत होती. मात्र, त्या ठिकाणीसुद्धा कारवाईची चर्चा सुरूच होती.
आरोग्य विभागात दिसून आली दिवसभर धावपळ
डॉ. पराडकर यांना लाच घेताना अटक केल्यानंतर शनिवारी आरोग्य विभागात धावपळ दिसून आली. ‘डॉक्टर साहेबांच्या जामिनासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची जमवाजमव करा, जी महत्त्वाची कागदपत्रे वाटतात ती त्वरित जमा करा’ अशा प्रकारच्या सूचना दबक्या आवाजात काही कर्मचारी येथे एकमेकांना देताना दसत होते.