आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती जिल्ह्यात पुराचे दोन बळी, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा 19 गावांना फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले. पूर्णा धरणाचे दरवाजे उघडल्याची माहिती नदीकाठच्या गावकर्‍यांना वेळेत न मिळाल्यामुळे 19 गावांमध्ये पाणी शिरून हाहाकार उडाला. या पुरामुळे शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.
मुसळधार पावसामुळे अपर वर्धा, सापन, पूर्णा, निम्न वर्धा प्रकल्पातील पातळी अचानक वाढली. त्यामुळे या धरणांची दारे उघडण्यात आली. पूर्णा प्रकल्पाची दारे तीन मीटर उघडण्यात आली, मात्र त्याची माहिती गावकर्‍यांना न मिळाल्याने ब्राम्हणवाडा, विर्शोळी, थुंगाव पिंप्री, कुरळ, काजळी, देऊरवाडा, आसेगाव, राजना, धानोरा, तुळजापूर गढी आदी गावांत पाणी शिरले. शेती व घरांचीही अपरिमित हानी झाली.

दरम्यान, ब्राम्हणवाडा थडी येथील स्वप्निल वांगे (16) हा मुलगा वाहून गेला. रविवारी सायंकाळी त्याचा मृतदेह गाळात रुतलेला आढळून आला. तसेच वरूड तालुक्यातील इसत नदीला आलेल्या पुरात झणकलाल विष्णू कवडेती (28) हा युवक वाहून गेला. पूर्णा नदीच्या काठावरील 3 ते 4 हजार गावकर्‍यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. पुरामुळे कोट्यवधी रुपयांच्या संत्र्याच्या बागा व पिके खरडून गेली. दरम्यान, पूर ओसरल्यानंतर ग्रामस्थांची शाळा, मंगल कार्यालयांत निवासाची सोय करण्यात आली.

भंडारदरा धरण 40 टक्के भरले
नगर - पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे सोमवारी भंडारदरा धरणात 3835 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला, हे धरण 40 टक्के भरले आहे. मुळा धरणात 8713 दशलक्ष घनफूट पाणीसाठा असून हे धरण 35 टक्के भरले. कोतुळ येथे मुळा नदीचा विसर्ग 3 हजार 212 क्युसेक्सने मुळा धरणात जात आहे. निळवंडे धरणाचा साठा 35 दशलक्ष घनफुटाने वाढला.
श्रावणात घननिळा राज्यभर बरसला
पुणे - बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्टय़ाची तीव्रता वाढली आहे, तसेच अरबी समुद्रात नव्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे राज्याच्या बहुतेक भागात जोरदार श्रावणसरी कोसळत आहेत, अशी माहिती ‘आयएमडी’ने दिली. आगामी 24 तासांत ही तीव्रता टिकून आणखी पाऊस बरसेल.
गंगापूर धरणाचा साठा 8 टक्के वाढला
नाशिक - त्र्यंबकेश्वर, अंबोली या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने गंगापूर आणि दारणा धरणातील पाणीसाठा अनुक्रमे आठ व 50 टक्क्यांनी वाढला आहे. नगर आणि औरंगाबाद जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात सध्या 2 हजार 178 दशलक्ष घनफूट तर दारणा धरणात 3 हजार 761 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे.