आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकिलांनी उगारले बहिष्कारास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- न्यायालयात एका वकिलाला न्यायाधीशांनी चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करत संबंधित न्यायाधीशांची बदली होत नाही, तोपर्यंत कामकाज न करण्याचा निर्णय वकिलांनी गुरुवारी घेतला. यामुळे न्यायालयाचे कामकाज दिवसभरासाठी प्रभावित झाले होते. मागणी मान्य होईपर्यंत कामकाजावर बेमुदत बहिष्कार टाकण्याचा निर्णय बार असोसिएशनने घेतला आहे.
या प्रकरणी बार असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयात एक वकील पक्षकाराची उलटतपासणी घेत असताना पक्षकाराने दिलेल्या जबाबाप्रमाणे न्यायाधीशांनी नोंद केली नाही, त्यामुळे वकिलाने न्यायाधीशांना या संबंधी विचारणा केली असता, संबंधित न्यायाधीशांनी, आपण कोर्टाचा अपमान केला असल्याचे सांगत वकिलालाच नोटीस बजावली आणि 200 रुपये दंड ठोठावला.
दंड न भरल्यास पोलिसांना अटक करण्याचे आदेश दिल्याची माहिती बार असोसिएशनने दिली. या घटनेनंतर असोसिएशनने तातडीने विशेष सर्वसाधारण सभा घेत संबंधित न्यायाधीशांची बदली झाल्याशिवाय कामकाज करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
येथील चवथे दिवाणी न्यायाधीश व प्रथर्मशेणी न्यायदंडाधिकारी सुरभी साहू यांच्या न्यायालयात हा प्रकार घडला. गुरुवारी अँड. विनोद गजभिये याच न्यायालयात एका दिवाणी प्रकरणात पक्षकाराची उलटतपासणी घेत होते. पक्षकाराने दिलेला जबाब न्यायाधीश नोंदवतात. हाच जबाब नोंदवताना पक्षकाराने सांगितल्याप्रमाणे न्यायाधीशांकडून नोंदी नोंदवल्या गेल्या नसल्याचा आरोप अँड. गजभिये यांनी केला. न्यायाधीश साहू यांनी त्यांना अवमानना नोटीस बजावली; तसेच 200 रुपयांचा दंडही ठोठावला. हा दंड दोन वाजेपर्यंत न भरल्यास ताब्यात घेण्याचे आदेशसुद्धा उपस्थित पोलिसांना दिल्याचा आरोप बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अँड. चंद्रकांत डोरले यांनी केला आहे.
या प्रकारानंतर अँड. गजभिये वकील संघाच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी या प्रकाराची तक्रार वकील संघाकडे केली. न्यायाधीशांकडून कोणत्याही वकिलाला या प्रकारे गैरवर्तणूक देणे योग्य नसल्याचे सांगत वकील संघाने तातडीने विशेष सर्वसाधारण सभा आमंत्रित केली. या सभेमध्ये सर्व वकिलांनी न्यायाधीश साहू यांची बदली होईपर्यंत न्यायालयीन कामकाज न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वकील संघाचे सर्व पदाधिकारी व अँड. गजभिये यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांची भेट घेतली.
या वेळी न्यायाधीश साहू यांच्या न्यायालयात सुरू असलेले अँड. विनोद गजभिये यांचे प्रकरण दुसर्‍या कोर्टात वर्ग करण्यात आले. वकील संघाने घेतलेल्या निर्णयाबाबत फेरविचार करून बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन न्यायमूर्ती ढवळे यांनी केल्याची माहिती अध्यक्ष अँड. डोरले यांनी दिली आहे.
प्रकरणाची माहिती उच्च न्यायालयाला दिली
घडलेला प्रकार गंभीर आहे. वकील संघाने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ही माहिती उच्च् न्यायालयाला दिली जाणार असल्याचे समजते. या बाबत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांची भेट घेतली असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला. प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी आपल्याला उच्च् न्यायालयाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वकिलाला चुकीची वागणूक दिल्याचा आरोप करत वकिलांनी दिवसभर न्यायालय परिसरात बहिष्कार आंदोलन केले.
वकिलांचा कामकाजावर बहिष्कार कायमच..
न्यायाधीशांकडून वकिलांना अशाप्रकारे वागणूक मिळायला नको. हा प्रकार गंभीर आहे म्हणूनच न्यायाधीश साहू यांची बदली होईपर्यंत वकील संघाने न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याचवेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अरुण ढवळे यांनी अँड. गजभिये यांच्यावरील न्यायाधीश साहू यांनी दिलेली शिक्षा खारिज केली आहे. अँड. चंद्रकांत डोरले, अध्यक्ष, अमरावती जिल्हा वकील संघ.