आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभ्रम: एलबीटीचे भरारी पथक की वसुलीचे वाहन?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) वाहनावर नियमबाह्य स्टीकर लावण्यात आले आहे. त्यामुळे एलबीटी भरारी पथकाचे वाहन ‘वसुली वाहन’ तर नाही ना, असा प्रश्न विचारला जात आहे. एलबीटीच्या वाहनास देण्यात आलेला विशिष्ट रंग आणि त्याची रचना बघता, दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एलबीटी लागू झाल्यानंतर जकात नाके बंद झाले. या प्रणालीमध्ये व्यापार्‍यांनी स्वत:हून कराचा भरणा करणे बंधनकारक आहे. व्यापार्‍यांनी शहरात आणलेल्या मालाचे कागदपत्र तपासण्याचे अधिकार एलबीटी विभागातील अधिकार्‍यांना आहे. त्याकरिता व्यापार्‍याला संबंधित कागदपत्रे घेऊन महापालिकेतदेखील बोलावता येते. मात्र, अमरावती महापालिकेचा या उलट कारभार असल्याचे दिसून येत आहे. जकात विभागात बड्या पदावर राहिलेल्या महापालिकेतील अधिकार्‍यांनी भरारी पथकात जागा मिळवली आहे. वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूस ठळक अक्षरात ‘भरारी पथक’ असे लिहिलेले आहे. त्यामुळे या वाहनाचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यापार्‍याला कागदपत्रे घेऊन महापालिकेत बोलावण्याऐवजी पथकातील अधिकारी-निरीक्षकच त्यांच्या दुकानात जाऊन मालासंबंधी कागदपत्रांची तपासणी करीत असल्याचे चित्र शहरात आहे.

अधिनियमाचा आधार
महाराष्ट्र महापालिका अधिनियम 152 अन्वये स्थानिक स्वराज्य संस्था कराची वसुली करण्यासाठी भरारी पथकाचे गठण करता येते. उपायुक्त दर्जाचा अधिकारी त्याचे नेतृत्व करतो. नियमानुसारच भरारी पथक काम करते.
-सुनील पकडे, जकात अधीक्षक

परवानगी घेतली नाही
वाहनाला अशाप्रकारे रंगवता येत नाही. एलबीटी विभागातील संबंधित वाहनावर भरारी पथकाचे अशाप्रकारे स्टीकर लावण्याची मागणी करणारे पत्र महापालिकेकडून प्राप्त झाले नाही. सोबतच प्रादेशिक परिवहन विभागाकडून अनुमतीदेखील घेण्यात आली नाही.
- मनोज ओतारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी.

भरारी पथकातील सदस्य
उपायुक्त, जकात अधीक्षक आणि तीन निरीक्षकांचा समावेश एलबीटीच्या भरारी पथकामध्ये आहे. दररोज सकाळी भरारी पथकातील सदस्य धाडसत्रावर जात असल्याची माहिती आहे.