आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lbt Collection Campaign By Amravati Municipal Corporation

स्थानिक संस्था कर चुकवणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाईचा बडगा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- महापालिका स्थानिक संस्था कराद्वारे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्नरत आहे. त्यासाठी धडक मोहीम हाती घेणार आहे. कर चुकवणार्‍या व्यापार्‍यांवर महापालिकेचे विशेष लक्ष राहील. दंडात्मक व फौजदारी कारवाईचे अस्त्रसुद्धा उगारले जाऊ शकते. दिवाळीचा मूड संपल्यानंतर लगेचच या कारवाईस सुरुवात होणार आहे.

दिवाळी तसेच दसर्‍याच्या पार्श्वभूमीवर कोट्यवधींची उलाढाल व्यापार्‍यांकडून झाली. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक स्थानिक संस्था कर वसुली होण्याची अपेक्षा आहे. व्यापार्‍यांकडून एलबीटीचा भरणा स्वयंस्फूर्त केला जावा, यासाठी दिवाळीनंतर काही दिवसांचा कालावधी महापालिका प्रशासनाकडून दिला जाणार आहे. व्यापार्‍यांचे अपेक्षित सहकार्य न मिळाल्यास कारवाईची मोहीम उघडली जाणार आहे. दसर्‍यासाठी सप्टेंबर आणि दिवाळीकरिता ऑक्टोबर महिन्यात महापालिका क्षेत्रात आलेल्या वस्तूंच्या कागदपत्रांची तपासणी मोहीम उद्यापासूनच आरंभ केली जाणार आहे. यादरम्यान कागदपत्रांमध्ये त्रुट्या आढळल्यास व्यापार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेकडून देण्यात आला आहे.

निशाण्यावरील व्यापारी
स्थानिक संस्था कर (एलबीटी) नोंदणीकडे पाठ फिरवणारे 1,313 व्यापारी फौजदारी कारवाईच्या कक्षेत आहेत, तर नोंदणी करतेवेळी योग्य विवरण सादर न करणार्‍या व्यापार्‍यांची संख्या ही तब्बल 7,272 इतकी आहे. याअगोदर स्थानिक राजापेठस्थित व्हीआयपी बार व रेस्टारेंटविरोधात पहिली फौजदारी; त्याचप्रमाणे रंगरूप मेन्स वेअर या प्रतिष्ठानाचे बँक खाते गोठवण्याबाबतची कारवाईही नुकतीच करण्यात आली. यापुढे व्यापार्‍यांनी एलबीटी भरणा करण्यास कुचराई केल्यास कारावाईला सामोरे जावे लागेल. उत्पन्नवाढीच्या दृष्टीने महापालिका प्रशासन याबाबत गंभीर आहे.

असा आहे नियम
एलबीटीची नोंदणी करणार्‍या व्यापार्‍यांविरोधात मुंबई महापालिका अधिनियम 152 (एन) अंतर्गत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. नियम 48(2)(क)मधील तरतूदीनुसार विना नोंदणी व्यापार केल्यास एलबीटी रक्कमेच्या दहा पट शास्त व देय व्याजाची कारवाई होऊ शकते. एलबीटी न भरल्यास पहिल्या बारा महिन्याकरिता एलबीटीच्या दरमहा दोन टक्के आणि त्यानंतरही कर न भरल्यास तीन टक्के दंडाची कारवाई केली जाते. विहित मुदतीत कागदपत्रे सादर न केल्यास दहा हजार रूपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

शहरातील व्यापार्‍यांनी सहकार्य करावे
एलबीटी अंतर्गत वार्षिक विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. प्रशासनाने सहकार्य करूनही अनेक व्यापार्‍यांनी ते भरले नसल्याचे चित्र आहे. एलबीटी लागू होऊन दीड वर्षांचा कालावधी होऊनही सद्य:स्थितीत वसुली मंदावली आहे. सोबतच अतिवृष्टीमुळे बाजारावर मंदी जाणवत आहे. प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या योग्य कारवाईस व्यापारी सहकार्य करतील, तर अतिरेक केल्यास विरोधदेखील केला जाईल. घनश्याम राठी, सचिव, चेम्बर ऑफ अमरावती महापालिका र्मचंट असोसिएशन.

कारवाई आरंभ करणार
व्यापार्‍यांनी एलबीटीचा स्वयंस्फूर्त भरणा करावा म्हणून दिवाळीनंतर काही दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. यादरम्यान कागदपत्रांची नियमित तपासणीही होणार आहे. त्यामध्ये त्रुटी आढळल्यास दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली जाईल आणि नोंदणी न करणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. रामदास सिद्धभट्टी, महापालिका उपायुक्त.