अमरावती- महापालिका क्षेत्रातून एलबीटी हटवण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, एलबीटी, जकात हद्दपार करण्याबाबत 26 महापालिकेतील व्यापाऱ्यांची मंगळवारी (दि. 4) मुंबईत बैठक होणार आहे. भाजपच्या नवीन सरकारसोबत ‘फॅम’चे प्रतिनिधी मंडळदेखील चर्चा करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच आश्वासन दिल्याने याबाबत लवकरच तोडगा निघण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रातील 26 महापालिका क्षेत्रात स्थानिक संस्था कर, तर मुंबईत जकात कर लागू करण्यात आला आहे. व्यापारी संघटनांकडून या दोन्ही करांचा विरोध करण्यात आला आहे. अमरावती महापालिकेतूनदेखील एलबीटी हटवण्याबाबत महानगर चेम्बर ऑफ काॅमर्सकडून या विरोधात आंदोलन करण्यात आले आहे. राज्यव्यापी आंदोलनादरम्यान शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवत व्यापाऱ्यांनी एलबीटीचा विरोध केला होता. शिवाय मागील सहा ते सात महिन्यांपासून अनेक व्यापाऱ्यांनी एलबीटी भरणेदेखील बंद केले, त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. मंगळवारी होऊ घातलेल्या फेडरेशन ऑफ महाराष्ट्र असोसिएशनच्या (फॅम) बैठकीत एलबीटी जकात हटवण्याबाबत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा, याबाबत चर्चा केली जाणार आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यापाऱ्यांना आश्वासन देखील दिले होते. या आश्वासनाच्या पूर्तीबाबत व्यापारी चर्चा करणार आहेत.