आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी वसुलीच्या मोहिमेला आला वेग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - आयुक्तांच्या सूचनेनंतर एलबीटी विभागाने सुरू केलेली वसुली आणि तपासणी मोहिमेने वेग घेतला आहे. महापालिकेला 20 डिसेंबरपर्यंत चार कोटी 92 हजार प्राप्त झाल्याने येणार्‍या दिवसात सर्वाधिक वसुली होण्याचे संकेत आहेत. एप्रिल महिन्यात साडेसात कोटी वसूल केल्यानंतर सातत्याने वसुली कमी झाली होती,हे येथे उल्लेखनीय.

महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने एलबीटी वसुलीत वाढ करण्याची किमया प्रशासनाला करावी लागणार आहे. उत्पन्नात घट झाल्याने 2013-14 च्या अर्थसंकल्पात कपात करण्याची वेळदेखील महापालिका प्रशासनावर आली. परिणामी, कर्मचार्‍यांचे वेतन, नगरसेवकांचे मानधन, कंत्राटदारांची देणी, नगरसेवकांचा विकास निधी आदी सर्व बाबींवर परिणाम झाला. स्थायी समिती तसेच आमसभेने एलबीटी विभागावर ताशेरे ओढल्यानंतर आयुक्त अरुण डोंगरे यांनी काही दिवसांपूर्वी संबंधित विभागाची बैठक घेतली. एलबीटी वसुली वाढवण्याच्या दृष्टीने विभागातील अधिकारी, निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली. प्रत्येक महिन्याचे लक्ष्य देण्यात आले. एलबीटी वसुली वाढविण्यासाठी आयुक्तांनी संबधित विभागाला कडक सूचना दिल्या. त्यानंतर एलबीटी वसुली आणि तपासणी मोहिमेने वेग घेतला आहे. दरम्यान चोरट्या मार्गाने येणारे लाखो रुपयांचे साहित्यदेखील ताब्यात घेऊन व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कर्मचार्‍यांचे मनोबल वाढल्याने डिसेंबर महिन्यात एलबीटी वसुलीत वाढ होण्याचे स्पष्ट संकेत विभागाकडून मिळत आहेत. सात-आठ दिवसांचा कालावधी शिल्लक असून, मागील सहा महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमध्ये सर्वाधिक एलबीटी वसूल होणार असल्याचे चित्र आहे.

50 कोटी वसुलीचे लक्ष्य
अर्थसंकल्पात तरतूद केल्याप्रमाणे आगामी तीन-चार महिन्यांत महापालिकेला 50 कोटी रुपये एलबीटीतून वसूल करावे लागणार आहेत. त्यासाठी विभागाने एलबीटीबाबत मूल्यांकन आरंभ केले आहे. संपूर्ण वर्षात व्यापार्‍यांकडून भरण्यात आलेल्या एलबीटीची माहिती तपासली जात आहे. त्यानंतर सर्वाधिक येणी वसूल असलेल्या व्यापार्‍यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एलबीटी वसूल करण्याबाबत कारवाई केली जाणार आहे.