आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला जाळणार्‍या पतीस दिली जन्मठेप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सुमारे सव्वादोन वर्षांपूर्वी पत्नीची जाळून हत्या केल्याप्रकरणी आरोपी पतीला येथील न्यायालयाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दोन ऑक्टोबर 2011 रोजी मंगरुळ दस्तगीर येथे ही घटना घडली होती. चंद्रशेखर विनायक वर्गणे (40) असे जन्मठेप झालेल्या आरोपी पतीचे नाव आहे.

कासारखेड येथील वंदना यांचा (35) मंगरुळ दस्तगीर येथील चंद्रशेखर वर्गणे याच्याशी 15 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. वंदना यांना नयना (12) व अविनाश (8) अशी अपत्ये आहेत. वंदना आणि चंद्रशेखर यांच्यात घरगुती कारणावरून नेहमीच खटके उडायचे. यातच दोन ऑक्टोबरला दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात चंद्रशेखरने वंदनावर केरोसीन टाकून त्यांना पेटवून दिले. गंभीर जळालेल्या अवस्थेत वंदनाला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वंदना यांच्या मृत्युपूर्व बयाणात सर्व बाबींचा तपशील विस्तृतपणे आल्याने हा मुख्य पुरावा ठरला. या व्यतिरिक्त न्यायालयाने 12 साक्षीदार तपासले. यात एक साक्षीदार फितुर झाला.

घटनेच्या दिवशी तपासादरम्यान प्राप्त झालेले पुरावे आणि तपशील या आधारावर आरोपी चंद्रशेखरवर गुन्हा सिद्ध झाल्याने त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अँड. संजय लोणे यांनी युक्तिवाद केला. या बहुचर्चित प्रकरणाचा निकाल ऐकण्यासाठी नागरिकांनी न्यायालयाच्या परिसरात मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती.