आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘रणरागिणीं’चे दारुबंदीसाठी रणकंदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - वडाळी परिसरातील दारू दुकान हटवण्यासाठी महापालिका क्षेत्रात रविवारी (दि. 16) पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या मतदानास मतदार यादीतील घोळाचा आरोप, महिलांचा रुद्रावतार आणि दगडफेकीचे गालबोट लागले. परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिस आणि कमांडोंना पाचारण करावे लागले. सकाळी आठ वाजता सुरळीत सुरू झालेले मतदान दुपारी पावणेदोन वाजता मतदान यादीतील घोळामुळे ठप्प झाले. मतदानकेंद्रात घुसून मतपेट्या केंद्राबाहेर काढण्यास महिलांच्या जमावाने विरोध केला. पोलिस उपायुक्त संजीव लाटकर आणि महापालिका उपायुक्त रामदास सिद्धभट्टी यांनी संतप्त महिलांशी चर्चा केली. दरम्यान, दारू दुकानविरोधी शिष्टमंडळ प्रभारी जिल्हाधिकार्‍यांना भेटण्यास रवाना झाले. सायंकाळी सात वाजता प्रभारी जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या निर्णयाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली असून, अजूनही बंदोबस्त कायम आहे.


यादीत नावांचा घोळ झाल्याने संतप्त महिलांनी मतदान प्रक्रियेविरोधात आक्रमक भूमिका घेऊन मतदान केंद्रावरच ठिय्या मांडला. या वेळी महापालिका उपायुक्त रामदास सिद्धभट्टी यांना महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला. लगेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. काहीच वेळात परिसरास पोलिस छावणीचे स्वरूप आले. महिला पोलिस शिपाई, पुरुष पोलिस कर्मचारी, कमांडो पथक यांच्यासह पोलिस उपायुक्त संजीव लाटकर, सहायक पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर घटनास्थळी दाखल झाले.


वडाळी परिसरातील दारूचे दुकान बंद करण्यासाठी रविवारी (16 फेब्रुवारी) या प्रभागात महापालिकेतर्फे दहा केंद्रांवर मतदान घेण्यात आले. सकाळी आठ वाजतापासून सुरू झालेली मतदान प्रक्रिया दुपारी पावणेदोन वाजता ठप्प झाली. यामुळे संतप्त चारशे ते पाचशे महिलांनी मतदान प्रक्रिया रद्द करून पुन्हा घ्यावी, अशी मागणी करत मतदान केंद्रात घुसून तेथील साहित्याची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. पोलिस बंदोबस्ताला न जुमानता काही महिलांनी हातात विटा घेऊन मतदान केंद्राकडे धाव घेतली. एका केंद्रावर दगडफेकही केली. मतदानात गैरप्रकार झाला, असा आरोप करत मतपेट्या केंद्राबाहेर नेण्यास महिलांनी संघटितपणे विरोध केला. क्रमांक 15 /6 या मतदान केंद्रात दुपारी पावणेदोनच्या सुमारास काही महिला अचानक घुसल्या आणि मतपेटी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या वेळी विवेक प्रल्हाद देशमुख, योगेश ठाकरे आणि रूपेश गोलाईत हे निवडणूक कर्मचारी तेथे हजर होते.


काय म्हणतात मतदार..
अधिकार्‍यांचे सहकार्य नाही
मतदार यादीत नाव शोधले; मात्र सापडले नाही. केंद्रावरील अधिकार्‍यांना विचारणा केली, तर कोणीही सहकार्य केले नाही. आमचे नावे वगळल्याचा संशय आहे. रूपाली सहारे
पुन्हा मतदान घ्यावे
मतदान केंद्रावर असलेल्या याद्यांमध्ये घोळ आहे. माझे नाव मतदार यादीत सापडले. मात्र, शेकडो महिला मतदानापासून वंचित आहेत. मतदानाची प्रक्रिया पुन्हा राबवावी. दीपाली धसकट
मतदान यादीत नाव नाही
महापालिकेच्या निवडणुकीत दोन वर्षांपूर्वी शाळा क्रमांक 14 च्या याच केंद्रावर मतदान केले. मात्र, आज मतदार यादीत नाव दिसले नाही. अधिकारीही मदत करत नव्हते. कमलाबाई कांबळे
अंतिम यादीचा उपयोग
दोन वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत उपयोगात आणलेल्या मतदार यादीचा आम्ही उपयोग केला. यात साडेचार हजार महिलांची मतदार म्हणून नावांची नोंद आहे. आम्ही त्यांना प्रारूप यादी दिली नाही. रामदास सिद्धभट्टी, उपायुक्त महापालिका