अमरावती - वडाळी भागातील देशी दारूचे दुकान हद्दपार करण्यासाठी रविवारी (दि. 16) मतदानादरम्यान जो घोळ झाला, त्याची चौकशी उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे करणार आहेत. जिल्हाधिकार्यांनी याबाबत आदेश दिले. ठाकरे यांच्या चौकशी अहवालानंतरच मतमोजणीचा निर्णय घेतला जाणार आहे.
प्रारूप मतदार यादी व अंतिम मतदार यादी अशा दोन प्रकारच्या याद्या पुरवल्यामुळे सुमारे 60 टक्के महिलांना रविवारी मतदानाचा हक्क बजावता आला नाही, असा दारू दुकानाविरुद्ध आंदोलन छेडणार्या महिलांचा आरोप होता. पुनर्मतदानाची मागणी करीत त्यांनी रविवारी मतमोजणीस मज्जाव केला होता. शेवटी प्रभारी जिल्हाधिकारी किशोर कामुने यांनी मतमोजणी थांबवून यातून मार्ग काढला.
दरम्यान, दुसर्या दिवशी सोमवारी जिल्हाधिकार्यांनी एसडीओ ठाकरे यांची एकसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. ही समिती लवकरच मतदान प्रक्रियेतील घोळाची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले.
निवडणुकीतील घोळ आणि अपेक्षांबाबत केले अवगत
आंदोलक महिलांनी सोमवारी दुपारी दीर्घ रजेनंतर रुजू झालेले जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांची भेट घेतली. निवडणूक प्रक्रियेचा एकूणच लेखाजोखा त्यांच्या पुढय़ात ठेवण्यात आला. शिवाय झालेला घोळ आणि पुढील अपेक्षांबाबतही त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
मद्यविक्रेता, अधिकार्यांमध्ये हातमिळवणी!
आंदोलक महिलांनी दारूविक्रेता आणि अधिकार्यांमध्ये हातमिळवणी झाल्याचा आरोपही लावला. मतदान प्रक्रियेतील घोळ सांगण्यासाठी जेव्हा महिला मनपाच्या झोन कार्यालयात पोहोचल्या, त्यावेळी दारूविक्रेते प्रभुदास झांबानी व महापालिकेचे अधिकारी आधीच तेथे एकत्रित आले होते, असा संबंधितांचा आरोप आहे.