आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Load Rules Against 'off' Congress Chief Minister Will Visit

भारनियमनाविरोधात ‘बंद’ - कॉँग्रेस घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-शहरातील पाच फीडरवर गळतीचे प्रमाण अधिक असल्याने वीज कंपनीतर्फे भारनियमन करण्यात येत आहे. यासंदर्भात आमदार रावसाहेब शेखावत यांच्या नेतृत्वात कॉँग्रेस नगरसेवकांचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्र्यांची भेट घेणार आहे. 42 टक्क्य़ांपेक्षा जास्त गळती असणार्‍या फीडरवर भारनियमन करण्यात येते. त्यानुसार सुरुवातीला 10 फीडरवर भारनियमन करण्यात येत होते.
मात्र, पाच फीडरवर गळती कमी झाल्याने त्याच्या अखत्यारीतील भाग भारनियमनमुक्त झाले. उर्वरित पाच फीडरवर भारनियमन कायम आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी आंदोलन सुरू केले होते. त्याची दखल घेत आमदार शेखावत यांच्या प्रयत्नातून रात्रीचे भारनियमन आणि पथदर्शी प्रकल्प रद्द झाला होता. भारनियमनासंदर्भातील निर्णय राज्यपातळीवरील असल्यामुळे हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच निकाली निघणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
पाच फीडरवरील भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी इतवारा बाजार, ताजनगर, पठाण चौक, चांदणी चौक, हबीबनगर, अल हिलाल कॉलनी आदी भागांतील व्यावसायिकांनी सोमवारी दिवसभर प्रतिष्ठाने बंद ठेवली. महिलांनीही आंदोलनात सहभाग नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयापुढे याच मुद्दय़ावर मुस्लिम ब्लॉक हेल्पलाइन करीत असलेल्या साखळी उपोषणामध्ये सोमवारी सकाळी 11 कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला. पहिल्या दिवशी उपोषण करणारे रम्मू सेठ व इरफान अतहर अली पाचव्या दिवशी पुन्हा उपोषणात सहभागी झाले. प्रशासनाने तत्काळ दखल न घेतल्यास हा लढा आणखी तीव्र केला जाईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
भारनियमन रद्द करण्याचा प्रस्ताव
पाच फीडरवरील गळती अधिक असली तरी वसुली 100 टक्क्य़ांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे भारनियमन रद्द करण्यात यावे, असा प्रस्ताव तयार करण्यात आला. हा प्रस्ताव शासन व महावितरणकडे पाठवला जाणार आहे. दोन दिवसांत ही कार्यवाही करण्याचे निर्देश खासदार आनंदराव अडसूळ यांनी दिले आहेत.आमदार अँड.यशोमती ठाकूर, माजी आमदार संजय बंड, मुस्लिम हेल्पलाइनचे रम्मू सेठ, इरफान अतहर अली, शेख इरफान शेख रहेमान आदी पदाधिकार्‍यांसह प्रभारी जिल्हाधिकारी किशोर कामुने, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप घुगल, कार्यकारी अभियंता दिलीप मोहोड आदींसह नागरिक बैठकीला उपस्थित होते.