आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divay Marathi

शहरात वाजले रणसंग्रामाचे बिगुल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताच शहरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मरगळ झटकत राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून बुधवारी खासदार आनंदराव अडसूळ यांनी राजापेठ आरओबीचा मार्ग मोकळा झाल्याने कार्यकर्त्यांसह आनंदोत्सव साजरा केला. त्यांच्या या कृतीवर राजापेठ रेल्वे फाटक कृती समितीचे संस्थापक मुन्ना राठोड यांनी तीव्र आक्षेप घेतला. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांची गाडी अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी फोडल्याचे उघडकीस आले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या ‘नमो’ चहाचा अमरावतीकरांनी पुन्हा एकदा अस्वाद घेतला. या सार्‍या घडामोडींनी अखेर शहरात रणसंग्रमाचे बिगुल वाजले आहे.
राजापेठ आरओबी मार्गासाठी आनंदोत्सव
राजापेठ रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाचे भूमिपूजन केले नाही, तर निर्मितीचा मार्ग मोकळा झाल्याने आम्ही केवळ आनंदोत्सव साजरा केला. आनंदराव अडसूळ, खासदार रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपूल (आरओबी) निर्मितीचा मार्ग मोकळा झाल्याने आनंदोत्सव आणि रुग्णवाहिकांचे लोकार्पण करीत खासदार आनंदराव अडसूळ यांनी लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. राजापेठ चौकामध्ये हा सोहळा बुधवारी सकाळी 11 च्या सुमारास पार पडला.
अमरावतीकरांसाठी डोकेदुखी ठरलेल्या राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपुलाचा मार्ग मोकळा झाला असून, निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आली आहे. राजापेठ आरओबी निर्मितीच्या दृष्टीने खासदार अडसूळ यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या प्रकल्पाला मान्यता तर मिळालीच, निधीची तरतूद करण्यातही त्यांना यश आले. महानगरपालिकासह विविध विभागांशी समन्वय साधून हा प्रश्न निकाली लागल्याने राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर नारळ फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. निविदा प्रक्रिया पूर्णत्वास आली असून, वर्क ऑर्डर निघाल्यानंतर आरओबीचे भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती आहे. राजापेठ आरओबीच्या 32 कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा मनपाकडूनकाही दिवसांपूर्वीच काढण्यात आल्या. याच आनंदोत्सव कार्यक्रमादरम्यान दोन दिवसांपूर्वी प्राप्त झालेल्या चार रुग्णवाहिकांचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्याकडून लोकार्पण करण्यात आले.
रुग्णवाहिका आरोग्य विभागाला सुपूर्द करण्यात आल्या असून, राजापेठ चौक शिवसेना शाखा, सेंट्रल जेल, अवधूत महाराज संस्थान आणि सर्मपण बहुउद्देशीय संस्था यांना देखरेखीसाठी दिल्या जाणार आहेत. या कार्यक्रमाला आमदार अभिजित अडसूळ, माजी खासदार अनंत गुढे, माजी आमदार प्रदीप वडनेरे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते प्रा. प्रशांत वानखडे, भाजप शहराध्यक्ष तुषार भारतीय, शिवसेना महानगरप्रमुख दिगंबर डहाके, नगरसेविका सविता लाडेकर, डॉ. राजेंद्र तायडे, सुरेखा लुंगारे, संजय पावडे, प्रकाश तेटू, पराग गुडधे, नितीन तारेकर, विजय खत्री, वैभव मोहोकर आदी उपस्थित होते.
विश्वास रुजवण्याचे श्रेय
देशातील सामान्य चहा विक्रेतासुद्धा पंतप्रधान होऊ शकतो, हा विश्वास रुजवण्याचे र्शेय भारतीय जनता पक्षाला जाते. हे देशात यापूर्वी कधीही घडले नाही, असे या वेळी भाजपचे शहराध्यक्ष तुषार भारतीय म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हेच देशाच्या पंतप्रधानपदी निवडून येतील, असा विश्वास खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केला. या वेळी विनोद कलंत्री, सुरेखा लुंगारे, हसमुख पटेल, खुशाल जोशी, चेतन गावंडे, प्रशांत शेगोकार, अजय सारस्कर, आशुतोष शर्मा, प्रकाश तेटू, अनिल नंदनवार यांच्यासह भाजप, शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर शहरातील चित्रा चौकात भारतीय जनता पक्षाने बुधवारी ‘नमो’ चहावाटपाचा कार्यक्रम घेतला. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी या वेळी चहाचा आस्वाद घेतला. ‘नमो नमो.’, ‘हर हर मोदी, घर घर मोदी’चा नारा देत भाजपच्या विविध शाखांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चहाच्या संकल्पनेला वाहून घेतले आहे. चित्रा चौकात दुपारी आयोजित या कार्यक्रमात उत्सुकतेपोटी नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. यापूर्वीही भाजपतर्फे चहा वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर बुधवारी पुन्हा एकदा अमरावतीकरांनी चहा घेतला.