अमरावती-सायन्सकोर मैदानावर महायुतीच्या झालेल्या विदर्भातील पहिल्या जाहीर सभेतून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. आघाडी सरकारला सत्तेतून खेचण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना नवऊर्जा दिली. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपण मत मागायला नाही, तर गारपीटग्रस्त शेतकर्यांना दिलासा द्यायला आलो आहे, असे सांगत शेतकर्यांच्या दु:खावर फुंकर घातली.
शिवसेना, भारतीय जनता पक्ष, रिपाइं (आठवले), स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय समाज पक्ष यांचा समावेश असलेल्या महायुतीची विदर्भातील ही पहिली निवडणूक प्रचार सभा असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नेत्यांनी नेमका तोच धागा पकडत सहानूभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. सरकारने गारपीटग्रस्त भागांचा दौरा केला. मात्र, मदत कधी मिळणार, असा सवाल महायुतीच्या नेत्यांनी केला. या प्रसंगी कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. आघाडी सरकारला सत्तेवरून हटवत युतीला सत्ता मिळवून देण्याचे साकडे या प्रसंगी उपस्थित नेत्यांनी अमरावतीकरांना घातले.
व्यासपीठावर उद्धव ठाकरे, भाजपचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे, रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले, शिवसेना नेते सुभाष देसाई, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाऊसाहेब फुंडकर, खासदार प्रतापराव जाधव, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार संजय राठोड, आमदार अभिजित अडसूळ, आमदार विजयराज शिंदे, आमदार प्रवीण पोटे, आमदार डॉ. रणजित पाटील, माजी आमदार गुलाबराव गावंडे, माजी खासदार अनंत गुढे, लोकसभेचे निरीक्षक अनिल चव्हाण, विष्णू तांडेल, निरीक्षक सुनील साळवी, दिनेश सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख संजय बंड, माजी आमदार अनिल गोंडाणे, जिल्हाप्रमुख प्रा. प्रशांत वानखडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश भारसाकळे, निवेदिता चौधरी, किरण महल्ले, किरण पातूरकर, तुषार भारतीय आदींची उपस्थिती होती. जयंत डेहणकर यांनी सभेचे संचालन केले. सभेमुळे कार्यकर्त्यांना नवऊर्जा मिळाल्याचे या प्रसंगी नेत्यांनी स्पष्ट केले.