आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

महायुती, ‘आप’चे उमेदवारही कोट्यधीश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-महायुतीचे उमेदवार खासदार आनंदराव अडसूळ व आम आदमी पार्टीच्या उमेदवार प्रा. भावना वासनिक यांच्यासह एका अपक्ष उमेदवाराने गुरुवारी लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल केले. नामांकनासोबत जोडलेल्या शपथपत्रानुसार, अडसूळ यांच्याकडे सव्वातीन कोटींची मालमत्ता आहे, तर प्रा. वासनिक यांच्याकडे सव्वा कोटीची संपत्ती आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार्‍या उमेदवारांची संख्या आता सहा झाली आहे. मंगळवारी (दि. 18) नगरसेवक राजू मानकर यांनी पहिला अर्ज दाखल केला होता. गुरुवारी तीनपर्यंत या दोघांसह अपक्ष उमेदवार आशा अभ्यंकर यांनी उमेदवारी दाखल केली. महायुती व ‘आप’चे उमेदवार शक्तिप्रदर्शन करीत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. परंतु, आचारसंहितेमुळे पाच जणांनाच निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या दालनात प्रवेश मिळाला. अडसूळ यांच्यासोबत त्यांच्या अर्धांगिनी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय बंड, भाजप आमदार चैनसुख संचेती व किरण पातूरकर आदी होते. त्याच वेळी वासनिक यांच्यासोबत काही कार्यकर्ते तेथे पोहोचले होते. अडसूळ यांच्या संपत्तीचे विवरण : अडसूळ यांच्याकडे व्यक्तिगत पातळीवर 50 हजार व त्यांच्या पत्नी मंगला यांच्याकडे 45 हजार रुपयांची रोकड आहे. याशिवाय अमरावती, बुलडाणा, मुंबई, दिल्ली आदी ठिकाणच्या बँकांमधील ठेवी, बचत खात्यात असणारी रक्कम आणि म्युच्युअल फंड, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे, वाहने व जड-जवाहीर मिळून या दाम्पत्याकडे एक कोटी 41 लाख 39 हजार 898 रुपयांची चल संपत्ती आहे. त्याच वेळी शिरंबे व पाचगणी (जि. सातारा) येथील शेती तसेच पाचगणी, अमरावती, बुलडाणा, मुंबई येथील घरे व व्यवसायिक प्रतिष्ठाने मिळून एक कोटी 84 लाख 56 हजार 359 रुपयांची मालमत्ता असल्याचेही त्यांनी आपल्या शपथपत्रात लिहिले आहे. अशाप्रकारे अडसूळ दाम्पत्याची एकूण संपत्ती तीन कोटी 25 लाख 96 हजार 257 रुपयांवर पोहोचली आहे.
‘आप’च्या वासनिक यांची संपत्तीही कोटीच्या घरात : आम आदमी पार्टीच्या उमेदवार प्रा. भावना वासनिक यांची एकूण संपत्ती एक कोटी 22 लाख 89 हजार 332 रुपयांची आहे. यामध्ये त्या स्वत: व त्यांचे यजमान भावेश यांच्या नावे असलेल्या रकमांचा समावेश आहे.