आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election ,Latest News In Divya Marathi

राणा यांचे राजकीय शक्तिप्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी गुरुवारी (दि. 20) शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी दाखल केल्यानंतर शुक्रवारी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांनी नामांकन दाखल केले. रिपाइंचे उमेदवार डॉ. राजेंद्र गवई यांनी नामांकन दाखल करताना शक्तिप्रदर्शन केले. खासदार आनंदराव अडसूळ यांच्यापेक्षा आपली फेरी सरस ठरावी, असा प्रयत्न दोन्ही उमेदवारांचा होता. या घटनाक्रमामुळे निवडणुकीचे वातावरण खर्‍या अर्थाने तापायला लागले आहे.
राणा यांची उमेदवारी दाखल करायला आलेले उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत दसरा मैदान आणि वलगाव रोडवर वाहेद खान सभागृहात मेळावा पार पडला. शिवाय दसरा मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान फेरी काढून इर्विन चौकात प्रचार कार्यालयाचा शुभारंभ केला. या प्रत्येक ठिकाणी शक्तिप्रदर्शन झाले. पक्षध्वज आणि निवडणूक चिन्ह असलेली वाहने, कार्यकर्त्यांच्या डोक्यावरील टोप्याही सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.
पवारांना पाहण्यासाठी झुंबड
नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यांना पाहण्यासाठी नागरिकांसह शासकीय कर्मचार्‍यांची प्रचंड गर्दी होती. तीन वाजण्यास काही मिनिटे शिल्लक असताना ते पोहोचले. पाच जणांना अनुमती असल्याने त्यांच्यासह नवनीत राणा, उमेदवारी अर्जासह इतर कागदपत्रे सांभाळणारे युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते जितू दुधाने अशा मोजक्या व्यक्तींना प्रवेश मिळाला. त्यामुळे नवाब मलिक, तुकाराम बीडकर, कुलदीप पाटील गावंडे आदी मान्यवरांना बाहेरच थांबावे लागले.
गवई यांचा बैलगाडीतून प्रवास
राष्ट्रवादीच्या कोट्यातून उमेदवारीसाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार्‍या डॉ. गवई यांनी अखेर स्वपक्षाची (रिपाइं) उमेदवारी घोषित केली. उमेदवारी दाखल करताना ते किती गर्दी जमवू शकतात, हाही औत्सुक्याचा विषय होता. या पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी चांगली गर्दी जमवली. रामेश्वर अभ्यंकर, प्रा. भाऊ ढंगारे, भारिप-बमसं जिल्हाध्यक्ष प्रवीण मनोहर, रामभाऊ पाटील या नेत्यांसह ते स्वत: बैलगाडीत स्वार झाले होते. निळे ध्वज, कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी अशा थाटात निघालेल्या फेरीचे एक टोक इर्विन चौकात, तर दुसरे कॅम्प परिसरात होते.