आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election, Latest News In Divya Marathi

अवघी राष्ट्रवादी प्रकटली, शरद पवार, अजित पवार मुक्कामी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना केलेल्या प्रखर विरोधानंतर पक्षातून त्यांची झालेली हकालपट्टी आणि त्यानंतर खोडकेंनी केलेले शक्तिप्रदर्शन या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते शहरात डेरेदाखल झाल्याने खोडकेंनी राष्ट्रवादीला कडवे आव्हान निर्माण केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यातच नरेंद्र मोदी, गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या जाहीरसभांमुळे राष्ट्रवादीने अमरावती लोकसभा मतदारसंघातील लढत प्रतिष्ठेची केली आहे.
शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांच्याकरिता उद्धव ठाकरे तब्बल चार दिवस अमरावतीत तळ ठोकून होते, तर संजय खोडके यांनी ‘वर्‍हाड विकास मंच’ स्थापन करून गुणवंत देवपारे यांच्या बसपशी केलेली हातमिळवणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अडचणीची ठरू शकते, हे ध्यानात घेऊन शरद पवार यांनासुद्धा अमरावतीत एक दिवस मुक्कामी यावे लागले.
नवनीत राणा यांच्या उमेदवारीला खोडके दाम्पत्याने सुरुवातीला केलेला विरोध पक्षाने फार गांभीर्याने घेतला नव्हता. त्यानंतर राष्ट्रवादीचे अमरावती संपर्कप्रमुख अन्न व नागरीपुरवठा मंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून खोडकेंचा विरोध कमी करण्याचा केलेला प्रयत्न निष्फळ ठरला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी अमरावतीत एकाच दिवशी दोन वेगवेगळे मेळावे घेऊन खोडकेंचे मन वळवण्याचे केलेले प्रयत्नही सार्थकी लागले नाहीत. एवढय़ा अथक प्रयत्नांनंतरही काम फत्ते न झाल्याने अखेर दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवनीत राणा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 21 मार्चला हजेरी लावून जाहीर सभा घेतली.
या वेळी कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, प्रवक्ते नवाब मलिक यांनीही हजेरी लावली. अजितदादा पाठोपाठ गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाही अमरावतीत पाठवण्यात आले. आबांनी चार एप्रिलला शहरात दोन सभा घेतल्या. आबांपाठोपाठ अजित पवार यांनीही जिल्ह्यात दर्यापूरला दुसरी फेरी करून पाच एप्रिलला अमरावतीत मुक्काम ठोकला. त्यांच्यापाठोपाठ शरद पवार यांनी अचलपूरच्या दौर्‍यानंतर पुन्हा दुसर्‍या फेरीत अमरावतीत मुक्काम ठोकला.आपल्या या दुसर्‍या दौर्‍याच्या वेळी जाहीर सभा न घेता मतपरिवर्तन करू शकणार्‍या प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी पवार यांनी घेतल्या. खोडकेंच्या ‘वर्‍हाड विकास मंच’ची धास्ती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतल्याचेच नेत्यांच्या शहरातील मांदियाळीवरून स्पष्ट झाले आहे.