आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Amravati, Divya Marathi, Voters

वर्षभरापासून सुरू होती मतदार यादीची बांधणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुल महिवाल, जिल्हाधिकारी. - Divya Marathi
राहुल महिवाल, जिल्हाधिकारी.
अमरावती - अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या यादीतील नावे गहाळ असण्याला प्रशासन जबाबदार नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी स्पष्ट केले. मागील सव्वा वर्षापासून यादीची बांधणी सुरू होती, असेही ते म्हणाले.
जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकारांशी वार्तालाप केला. मतदार यादीची बांधणी मे 2013 पासून सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, 1 ते 31 मे दरम्यान मतदार याद्यांची पडताळणी केली गेली. जून महिन्याच्या 13 तारखेला वगळलेल्या नावांच्या नोटिसेस जारी झाल्या. त्यानंतर संबंधितांच्या घरी जाऊन पंचनामे करण्यात आले. याच दरम्यान 15 तारखेला राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना याबाबत अवगत करण्यात आले, असेही महिवाल यांनी स्पष्ट केले. 20 जून रोजी प्रारूप मतदार यादी प्रकाशित केली गेली. ही यादी इंटरनेटसह तालुका कचेरीपर्यंत सगळीकडे उपलब्ध होती.
वगळलेल्या नावांची यादीही प्रकाशित करण्यात आली होती. 25 जून रोजी जिल्ह्यातील सर्व सहायक निवडणूक अधिकार्‍यांची बैठक घेऊन जुलै 2013 मध्ये मतदार यादीचे पुन्हा प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर सहा जानेवारी 2014 पासून मतदार याद्यांचे पुनरिक्षण सुरू केले गेले. त्यानंतर 31 जानेवारी रोजी यादी परत प्रकाशित केली गेली. नऊ मार्चला निवडणूक आयोगाने घोषित केलेली मतदार नोंदणीची विशेष मोहीमही राबवली. या मोहिमेतही सुमारे 32 हजार नवी नावे नोंदवली गेली, असेही ते म्हणाले. शिवाय त्यापूर्वीही प्रत्येकाला अनेक वेळा संधी होती; परंतु कोणीही या मोहिमेला गंभीरपणे घेतले नाही.
संबंधितांनी गंभीरतेने न घेतल्याने घोळ
मतदार यादीचे पुनरिक्षण व नाव नोंदण्यासाठी वेळोवेळी घेतलेली विशेष मोहीम या दोन्ही बाबी गंभीरतेने न घेतल्यामुळे हा घोळ झाला आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व नागरिक या सर्वांना याबाबत अवगत केले गेले होते; परंतु तरीही कुणीच गंभीरतेने घेतले नाही. नाही तर हा अप्रिय प्रसंग ओढवला नसता. राहुल महिवाल, जिल्हाधिकारी.