आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Amravati, Governmental Offices

सुट्यांमुळे कर्मचारी ‘रिलॅक्स’, नागरिक झाले हैराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - निवडणुकांच्या दिवसांत नियमित कामांना फाटा बसल्यामुळे सामान्य नागरिक आधीच काकुळतीला आला असताना, मतदानाच्या दिवसापासून (दि. 10) सलग पाच दिवसांची सुटी आल्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.गुरुवारी मतदान असल्यामुळे सरकारी कार्यालये आणि खासगी संस्था व आस्थापनांना सुटी जाहीर करण्यात आली होती. मतपेट्या जमा करण्याचे काम उशिरा रात्रीपर्यंत सुरू राहिल्याने निवडणूक कार्य बजावणार्‍या विविध कार्यालयांमधील सुमारे 12 हजार कर्मचार्‍यांना दुसर्‍या दिवशीही कार्यालयात पोहोचता आले नाही. त्यानंतरचे दोन दिवस दुसरा शनिवार व रविवार असल्यामुळे सुटीच आहे. रविवारला जोडून सोमवारी (दि. 14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने त्या दिवशीही सुटी आली आहे. यामुळे कार्यालयीन काम होत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत, तर कर्मचार्‍यांना मतदानाच्या दिवसापासून सलग पाच दिवस ‘नो ऑफिस वर्क’ मिळाले. लोकसभा निवडणुकीमुळे पहिल्या दोन दिवसांतील ताण-तणाव सोडला, तर इतर तीन दिवस ‘रिलॅक्स’ असल्याने अनेकांना या कालावधीत प्रलंबित कामे निस्तारता आली. त्यामुळे काहींनी निवडणुकीचा शीण घालवावा म्हणून योजना आखल्या, तर अनेकांनी बरेच दिवसांनंतर कुटुंबीयांमध्ये मिसळण्याची संधी मिळाली म्हणून या तीन दिवसांचा यथेच्छ आनंद अनुभवला.


सहाव्या दिवशी हनुमान जयंती
पाच दिवसांच्या या मेगा ब्लॉकला जोडून आलेला सहावा दिवस हनुमान जयंतीचा आहे. त्यामुळे मंगळवारीही (दि. 15) काही कार्यालयांमध्ये संख्या रोडावण्याची शक्यता आहे. या पाश्र्वभूमीवर सरकारी कार्यालयांमधील खरे कामकाज बुधवारपासूनच (दि. 16) सुरू होईल.


एक कार्यालय असेही
सुट्यांचा थेट सप्ताह चालून आला असला, तरी कार्यमग्न अधिकारी-कर्मचार्‍यांनी मात्र महत्त्वाच्या कामांसाठी तो अडसर ठरू दिला नाही. त्यामुळेच उपायुक्त रवींद्र ठाकरे व त्या विभागाचे काही कर्मचारी सुटीच्या दिवशीही त्यांच्या दालनात होते. शेतकर्‍यांशी संबंधित ‘केम’ प्रकल्पाची बैठक घेऊन त्यांनी नियोजन केले. अतिवृष्टी व गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत वाटपाचे कार्य याच कार्यालयातून पुढे सरकते आहे.


कुटुंबाला दिला वेळ
निवडणुकीच्या कामांमुळे मागील महिनाभरात कुटुंबीयांना जराही वेळ देता आला नाही. त्यामुळे हाती लागलेल्या या तीन सुट्यांचे व्यवस्थित नियोजन करून कुटुंबातील सदस्यांना वेळ दिला. थोडेफार भ्रमण, उन्हाळ्यातील छंद शिबिरांची विचारपूस व आप्तस्वकीयांच्या भेटीगाठीसाठी हा वेळ वापरता आला. सुशील मेटकर, महसूल विभाग.