आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Divya Marathi, Melghat, Amravati

मेळघाट मतदारसंघाची भूमिका ठरणार निर्णायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सार्वत्रिक निवडणुकीत अमरावती मतदारसंघात आजपर्यंत मेळघाट मतदारसंघाची भूमिका निर्णायक ठरल्याचे आजपर्यंतच्या निकालावरून स्पष्ट होते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे लक्ष मेळघाट मतदारसंघाकडे लागले आहे. सोळाव्या सार्वत्रिक निवडणुकीत अमरावती मतदारसंघाच्या सहा मतदारसंघांपैकी मेळघाटमध्ये तुलनेत सर्वाधिक मतदान झाले. धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात तब्बल एक लाख 69 हजार 90 मते नोंदवली आहेत. मागील पंधरा निवडणुकांच्या तुलनेत मेळघाटातील मतदान टक्केवारीचा हा उच्चांक आहे. ज्या राजकीय पक्षांचे प्रतिनिधी प्रचार कार्यात आघाडी घेतात, त्या बाजूने मेळघाटचा कल झुकतो, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. 1991 मधील निवडणुकीत काँग्रेसच्या विजयी उमेदवाराला 42 हजार, तर शिवसेना उमेदवारास 13 हजार मते पडली होती. माकपच्या खात्यातही 17 हजार मते मेळघाटने टाकली होती.
1996 मधील लोकसभा निवडणुकीत पराभूत काँग्रेसच्या पारड्यात 23 हजार होती, तर विजयी शिवसेना उमेदवाराच्या मतांच्या टक्केवारीत भरघोस वाढ झाली होती. शिवसेनेला या वेळी अडीच पट म्हणजे 32 हजार मते मिळाली होती. 1998 मधील सार्वत्रिक निवडणुकीत पराभूत शिवसेनेच्या मतांमध्ये पुन्हा 30 टक्क्यांनी वाढ झाली. त्याचवेळी विजयी रिपाइंच्या मतातही दुपटीने वाढ नोंदवली गेली होती. राजकीय विश्लेषकांमध्ये मेळघाट मतदारसंघ एकगठ्ठा मतदानाकरिता परिचित आहे. 1998 नंतर झालेल्या तिन्ही निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी कमी असतानाही या मतदारसंघाने शिवसेनेला भक्कम साथ दिली होती.


सीबीआय चौकशी करा
मेळघाट मतदारसंघामध्ये मते मिळवण्याकरिता राजकीय पक्षांकडून विविध प्रकराची आमिषे, प्रलोभने दाखवण्यात आली, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते बंड्या साने यांनी केला आहे. या वेळी झालेल्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्याचे नेमके कारण काय, याचा छडा लावण्यासाठी सीबीआय चौकशी करण्यात यावी. अशी मागणी बंड्या साने यांनी केली आहे.