आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Vidarbh Region, Divya Marathi, Amravati

अमरावतीत हजारो मतदार मतदानापासून वंचित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - अमरावती विधानसभा मतदारसंघांतील 46 हजार नागरिकांची नावे यादीतून गहाळ असल्याचा आरोप खासदार आनंदराव अडसूळ यांनी केला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि निवडणूक निरीक्षक यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या असून, सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय झाला नव्हता.
नावे गहाळ असलेल्या मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, म्हणून मतदान केंद्र ते जिल्हाधिकारी कार्यालय, अशी पायपीट करावी लागली. निवडणूक आयोगाने दिलेले मतदार कार्ड आहे. परंतु, यादीत नाव नाही. त्यामुळे मतदान करता आले नाही, असे त्यांचे म्हणणे होते. खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले, जे या निवडणुकीत उमेदवार आहेत, त्यांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला. परंतु, विविध प्लॅटफॉर्मवर दाद मागूनही शेवटपर्यंत यश आले नाही. मतदार यादीतील नावे गहाळ असण्याच्या तक्रारी खासदार अडसूळ यांच्याशिवाय आमदार प्रवीण पोटे व अभिजित अडसूळ,शिवसेनेचे नगरसेवक दिगंबर डहाके व प्रदीप बाजड यांनीही केल्या आहेत. याशिवाय मुस्लीमबहुल क्षेत्रातील अनेक नावे गायब असल्याची तक्रार माजी उपमहापौर मिर्झा अख्तर नईम बेग यांनी केली आहे. दुपारी 4.30 च्या सुमारास अनेक नागरिकांसह त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मतदार ओळखपत्रे आहेत. परंतु, मतदार यादीत नावे नाहीत, अशा नावांची यादी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सादर केली.
खासदार अडसूळ आक्रमक : मोठय़ा प्रमाणात नावे गहाळ असल्याचे स्पष्ट झाल्यावर दुपारी साडेबाराच्या सुमारास अडसूळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. ते अनुपस्थित असल्यामुळे तेथून ते विभागीय आयुक्त कार्यालयात गेले. आयुक्त दत्तात्रय बनसोडदेखील कार्यालयात नव्हते. त्यामुळे उपायुक्त माधव चिमाजी यांच्याशी त्यांचा सामना झाला. निवडणूक यंत्रणेतील अधिकार्‍यांचे फोन नंबर नसल्यामुळे चिमाजी यांच्याशी त्यांची खडाजंगी झाली.
आयुक्त कार्यालयाचा गृहपाठ कच्चा : मतदार यादीत नावे नाहीत. परंतु, मतदार ओळखपत्र आहेत, अशांना मतदान करू द्यावे, यासाठी खा. अडसूळ यांना मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांच्याशी बोलायचे होते. परंतु, वारंवार विचारणा केल्यानंतरही त्या अधिकार्‍यांचा फोन नंबर मिळाला नाही. सुमारे 15 मिनिटांनंतर उपायुक्तांच्या स्वीय साहायकांनी एक भ्रमणध्वनी क्रमांक दिला. मात्र, तो चुकीचा होता. आयुक्त कार्यालयाचा गृहपाठ कच्चा असल्याचे स्पष्ट झाले.
अधिकाराची पायमल्ली
आयोगाचे ओळखपत्र असतानाही संबंधिताना मतदान नाकारणे ही घटनादत्त अधिकाराची पायमल्ली आहे. ओळखपत्र देण्याचे काम महसूल यंत्रणेनेच केले आहे. ज्यांची नावे कमी केली गेली, त्यांना कळवले का नाही ? नागरिक हयात असतानाही त्यांची नावे डिलीट कशी झाली ? याचाच अर्थ निवडणूक यंत्रणा शासनाच्या दबावात वागत आहे.’’
आनंदराव अडसूळ
योग्य संधी दिली होती
मतदार यादीत नावे नोंदण्यासाठी नागरिकांना योग्य त्या वेळी संधी देण्यात आली होती. शिवाय ज्यांची नावे वगळण्यात आलीत, त्यांची नावेही घोषित करण्यात आली होती. नागरिकांनी त्या वेळी सतर्कता बाळगली असती, तर कदाचित हा अप्रिय प्रसंग टळला असता.’’ राहुल महिवाल,निवडणूक निर्णय अधिकारी,