आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Yavatmal, Election Officer, Divya Marathi

अन् मटण सोडून कार्यकर्ते पळाले धुर्‍याने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - नेर तालुक्यातील कंझाळा परिसरात निवडणुकीच्या संदर्भाने आयोजित मटण पार्टीवर बुधवारी रात्री निवडणूक अधिकार्‍यांनी धाड मारली. अचानक कॅमेरे ऑन झाल्याने जेवणासाठी बसलेले कार्यकर्ते, पदाधिकारी मात्र शेत धुर्‍याने पळत सुटले. निवडणूक आयोगाने यासंदर्भात चौकशी केली असता कॉँग्रेसकडून ही पार्टी आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी नायब तहसीलदारांच्या तक्रारीवरून शेतमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या शेतात पार्टी सुरू होती त्या शेताला 15 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी गारपीटग्रस्त भागाच्या पाहणी दौर्‍यात भेट दिली होती.
अहिंसा, व्यसनमुक्ती यासह समाज प्रबोधनाच्या गप्पा मारणारे नेते मंडळीच प्रचारावर मोठय़ा प्रमाणात पैशाची उधळण कशी करत आहे, याचे उदाहरण म्हणून कंझाळा परिसरातील शेतात आयोजित या पार्टीकडे पाहिले जात आहे. नेते मंडळींकडूनच जागोजागी शेतात मटणाच्या पाटर्य़ा मतदानाच्या पूर्वसंध्येला ठेवण्यातआल्या होत्या. बोरीअरब नजीकच्या कंझाळा गावाशेजारी विष्णू कावरे यांच्या शेतात बुधवारी रात्री मटणाची पार्टी ठेवण्यात आली होती. याठिकाणी कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे वरिष्ठ पदाधिकारीसुद्धा उपस्थित होते. जवळपास अडीचशे ते तीनशे कार्यकर्ते, पदाधिकारी मटणावर ताव मारत असताना अचानक रात्री 9 च्या सुमारास नायब तहसीलदार डी. बी. काळे, लाडखेडचे ठाणेदार सतीश पाटील यांना दिनेश इंगोले यांनी फोन करून या पार्टीची सूचना दिली. माहिती प्राप्त होताच हे दोन्ही अधिकारी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. काही जणांना विचारले असता कॉँग्रेसने पार्टी आयोजित केल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळावरील काही वेळ चित्रीकरण करण्यात आले. नायब तहसीलदार काळे यांनी लाडखेड पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून शेतमालक विष्णू कावरे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.
मुख्यमंत्र्यांनी भेट दिलेले शेत
माणिकराव ठाकरे यांनी प्रयत्न करून निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कंझाळा येथील कावरे यांच्याच शेताची पाहणी करायला आणले होते. या घटनेला 15 दिवस होत नाही तोच, त्या शेतातच कॉँग्रेसने मटण पार्टी ठेवली. आता या घटनेने परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
साड्यांचे झाले वाटप
या शेतात प्रथम साड्यांचे वाटप झाले. मला माहीत होताच मी स्वत: पाहणी केली आणि ठाणेदार, तहसीलदारांना फोनद्वारे सूचना दिली. शेतात दारूच्या बॉटल्स आणि साड्या पडून होत्या. दिनेश इंगोले, प्रथम तक्रारकर्ता
गुन्हा दाखल केला
नायब तहसीलदार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त सीडीवरून तपास सुरू आहे. -सतीश पाटील, ठाणेदार लाडखेड