आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्‍ये राजकीय वातातवरण तापले, लोकसभेत इच्छुकांचे रणशिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य चर्चित चेहरे, मागील वीस वर्षांमध्ये या मतदारसंघावर शिवसेना-भाजप युतीने निर्माण केलेली पकड आणि प्रबळ उमेदवारांच्या शोधात असलेल्या कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील अस्वस्थता या पार्श्वभूमीवर 2014 मधील लोकसभा निवडणूक रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्यापूर्वीच राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. भाजप-शिवसेना युती वगळता अन्य एकाही राजकीय पक्षाच्या उमेदवाराची नावनिश्चिती अद्याप झालेली नाही. तरीही संभाव्य उमेदवारांच्या नावापुढे कोणत्या ना कोणत्या पक्षाचा शिक्का लागल्याचे दिसून येत आहे. काही इच्छुकांच्या दिल्ली आणि मुंबईच्या फेर्‍याही वाढल्या आहेत.भाजप-शिवसेना युतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी मात्र मागील वर्षभरापासून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे. 1996 पर्यंत अमरावती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचेच वर्चस्व होते. मात्र, त्यानंतर 1998-99 दरम्यान 13 महिन्यांचा कालावधी वगळता अमरावती मतदारसंघ शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात आहे. हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. त्यात रामदास आठवले आणि राजू शेट्टी यांच्या प्रादेशिक पक्षांची जोड मिळाल्याने महायुती भक्कम झाली आहे.

आघाडीमध्ये मतभेद
या मतदारसंघातून 1998 मध्ये रिपाइंचे दादासाहेब गवई निवडून आले होते. 1999 नंतर मात्र काँग्रेसने प्रत्येक निवडणुकीत गवई गटाला हा मतदारसंघ सोडला आहे. पण, रिपाइंला त्यानंतर या मतदारसंघात यश आले नाही. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीत रिपाइंशी आघाडी करण्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये मतभेद आहेत.

सेना भक्कम, आघाडीत बिघाडी
शिवसेना-भाजपा युतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. खासदार आनंदराव अडसूळ हेच उमेदवार असतील, असे उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच जाहीर केले. त्यामुळे युतीचा नवा मित्रपक्ष असलेल्या रिपाइंला (आठवले गट) अमरावती मतदारसंघ सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये या मतदारसंघावरून सध्या वाद सुरू आहे.

दहा दिवसांतील राजकीय घटनाक्रम

  • राष्ट्रवादीची मुंबईत बैठक. राजेंद्र गवई, नवनीत कौर, दिनेश बूब आणि गुणवंत देवपारे यांच्या नावावर चारविनिमय.
  • राजेंद्र गवई यांनी ‘घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा राष्ट्रवादीचा आग्रह.
  • बैठकीच्या नऊ दिवसांनंतर दिनेश बूब यांना राष्ट्रवादीची उमेदवारी दिल्याची चर्चा.
  • राष्ट्रवादीकडून अचानक बूब यांचे नाव पुढे आल्याने राजेंद्र गवई यांनी पत्रपरिषद घेतली.


अमरावती मतदारसंघात सध्या आमदार रवि राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांची लोकसभेची तयारी लक्षवेधी ठरली आहे. नागपूरचे बांधकाम व्यावसायिक गुणवंत देवपारे यांचा मतदारसंघातील जनसंपर्क राजकीय पक्षांकरिता चिंतेची बाब ठरत आहे. दिनेश बूब यांची उमेदवारी, मनसेचे प्रवक्ते बाळा नांदगावकर यांचा नुकताच अमरावती दौरा आणि बहुजन समाज पक्षाचा संभाव्य चेहरा यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे.