आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lokshahir Annabhau Sathe, Latest News In Divya Marathi

पोलिस, आंदोलकांमध्ये लपंडाव, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी ‘जेलभरो’ आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणीसाठी शनिवारी (ता. 16) झालेल्या जेलभरो आंदोलनात पोलिस आणि आंदोलकांमध्ये बराच वेळपर्यंत लपंडाव सुरू होता. यामुळे राजकमल चौकात तैनात पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा गल्र्स हायस्कूल चौकात बसवण्यात यावा, ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. वारंवार मागणी करूनही महापालिकेने पुतळा न बसवल्याने अण्णाभाऊ साठे पुतळा कृती समितीने राजकमल चौकात जेलभरो आंदोलन केले. उत्तम भैसने, दादासाहेब क्षीरसागर, राजाभाऊ हातागडे, बबन इंगोले, देवानंद वानखडे, अँड. भरत खडसे, विजय गायकवाड, सुधाकर खडसे, डॉ. रूपेश खडसे, पंकज जाधव, प्रकाश खंडारे, अँड. संजय वानखडे, प्रकाश वाळसे, प्रभाकर वाळसे, गणेश कलाने, गोपाल हिवराळे, विनोद वाघमारे, मनोज गवळी, रावसाहेब इंगोले, शालिग्राम वानखडे, नागेश वानखडे आदींच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची पूर्वकल्पना असल्याने शहर कोतवाली पोलिसांनी राजकमल चौकात तगडा बंदोबस्त ठेवला होता. सहायक पोलिस आयुक्त अशोक कळमकर, सहायक पोलिस निरीक्षक जयराम तावडे यांच्यासह प्रचंड मोठा पोलिस ताफा राजकमल चौकात तैनात होता. सुरुवातीला घोषणाबाजी करीत काही आंदोलक चौकात आले. त्यांना ताब्यात घेऊन मुख्यालयात रवाना करण्यात आले. आंदोलन संपले म्हणून काही अधिकारी रवाना होऊ लागले. त्यानंतर श्याम चौकातून घोषणाबाजी करीत काही आंदोलक पुन्हा राजकमल चौकाकडे आले व त्यांनी चौकाच्या मधोमध येऊन वाहतूक अडवली.
धावाधाव करीत पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पुन्हा अंबादेवीकडून काही महिला-पुरुष कार्यकर्ते घोषणाबाजी करत राजकमल चौकात दाखल झाले. मात्र, आधीच्या आंदोलकांना ताब्यात घेऊन बहुतांश वाहने मुख्यालयाकडे रवाना झाली होती. परिणामी, वाहने परत येईस्तोवर आंदोलकांची चौकात घोषणाबाजी सुरूच होती. दुपारी तीनपर्यंत आंदोलक आणि पोलिसांमध्ये हा लपंडाव सुरूच होता. प्रतिबंधात्मक कारवाईनंतर आंदोलकांना सायंकाळी सोडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.