आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होतं नव्हतं सगळं गेलं सांग साहेबा, काय करावं?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदूररेल्वे- संत्रा बागेसाठी विहीर खोदली. अडीच एकरांत फूलकोबी लावली. सगळं आलबेल होतं, पण या बुवार्‍या पावसानं क्षणात होत्याचं नव्हतं केलं. संत्रा गळाला, कोबी सडली, गहू झोपला. दोन लाखांचं कर्ज डोक्यावर आहे. अशा स्थितीत सायेब, आम्ही जगायचं तरी कसं, अशी आर्त व्यथा सातेफळचे गारपीटग्रस्त शेतकरी मनोहर तितरे यांनी केंद्रीय पाहणी पथकासमोर मांडली.
अकाली पाऊस व गारपिटीमुळे तालुक्यातील शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. गहू, हरभरा, भुईमूग, भाजीपाल्याची मोठी हानी झाली. संत्रा बागा गळाल्या. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी (दि. 14) केंद्रीय जल आयोगाचे उच्चस्तरीय अधिकारी डी. एस. रायपुरे व अप्पर जिल्हाधिकारी किशोर कामुने यांच्यासह जिल्हा कृषी अधिकारी रमेश भताणे यांनी सातेफळ, धनोडी गावांना भेटी दिल्या. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार इकबाल अहमद आदी उपस्थित होते. मनोहर तितरे यांचा चार एकरांतील हरभरा पूर्णपणे काळवंडल्याचे दिसून आले, तर अडीच एकरांतील कोंबी सडल्याने वास येत होता. अकाली पावसामुळे खराब झालेले पीक जनावरेही खाणार नाहीत, अशी पिकांची अवस्था झाल्याचे शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना सांगितले. गहू, हरभर्‍यासोबतच तालुक्यातील चार हेक्टर क्षेत्रातील केळी; 36 हेक्टरमधील कांदा व 63 हेक्टर शेतातील भुईमुगाचेही नुकसान झाले आहे.