आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांच्या साक्षीने दोन जिवांचे झाले मनोमीलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुड- दोन वर्षांपूर्वी ते लग्नसोहळ्यात भेटले. पहिल्या भेटीतच त्यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलला. मात्र, तरुणीचे नातेवाईक त्यांच्या बंधनाला अनुकूल नव्हते. दोन वर्षे त्यांनी प्रतीक्षा केली. काहीच उपयोग न झाल्याने अखेर दोघांनीही पोलिस ठाणे गाठले. ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं..’ याची प्रचिती देणार्‍या या प्रेमीयुगुलाचं शुभमंगल दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलिस ठाण्यात झालं.
शेंदूरजनाघाट येथील तुलना नामक तरुणीची एका लग्नसोहळय़ात मोर्शी येथील सर्मथ कॉलनीमध्ये राहणार्‍या मनीष नामक तरुणाशी तोंडओळख झाली होती. पाहता पाहता त्याचे प्रेमात रूपांतर झाले. त्यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या, ‘साथ जियेंगे, साथ मरेंगे’चा निर्धारही त्यांनी केला. मुलाच्या घरच्या मंडळींनी तडजोड करून प्रेमविवाहाला मान्यता दिली. परंतु, मुलीकडील मंडळींचा विरोध कायम होता. त्यामुळे त्यांनी दोन वर्षे प्रतीक्षेत घालवले. दोन वर्षांनी मनीष तुलनाच्या घरी धडकला आणि मी तिला घ्यायला आलो आहे, असे सांगितले. मात्र, विरोध कायम असल्याने त्यांनी ठाम नकार दर्शवला. अखेर प्रेमीयुगुलाने कुठल्याही विरोधाची पर्वा न करता आणि वादावादी नको म्हणून शेंदूरजनाघाट पोलिस ठाणे गाठून ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्यापुढे सर्व हकीगत कथन केली. दोघांचाही एकमेकांप्रति ठाम विश्वास असल्याचे पाहून ठाणेदारांनी मुलाच्या घरची मंडळी व नगराध्यक्ष सुभाष गोरडे यांना बोलावून घेतले. मुलाचे आई-वडील तातडीने पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांचा विरोध अर्थातच नव्हता. त्यामुळे ठाणेदार व कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत एकमेकांवर जिवापाड प्रेम करणार्‍या तुलना आणि मनीष यांचे शुभमंगल या वेळी करण्यात आले. या वेळी रविराज पुरी, अमोल कडू, संजय बेले, अतुल काळे, भूपेंद्र कुवारे, अरुण खेरडे, सुरेश खंडेलवाल, गजानन थेटे, सुखदेव बिजवे, पप्पू भालेराव आदी उपस्थित होते.