आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचे 25 वर्षांसाठीचे मराठी भाषाविषयक धोरण, भाषा सल्लागार समितीच्या मसुद्यावर चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मराठी भाषेच्या संवर्धनासाठी धोरण निश्चित करताना स्वतंत्र यंत्रणा महत्त्वपूर्ण असल्याची गरज संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात शुक्रवारी १३ फेब्रुवारीला झालेल्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली. यांसह मराठी भाषाविषयक धोरणामध्ये भाषा समृद्धीसाठी तिचा वापर व्हावा, यासाठी सहभागी झालेल्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्यात. त्यामध्ये मराठी भाषेत इतर भाषेतून शब्द आले असले, तरी त्याचे उच्चारण लेखन आणि व्याकरण हे मराठी भाषेच्या नियमानुसार व्हावे. महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेवरील शोधन प्रकल्पासाठी अर्थसहाय्य मिळावे आदी सूचनादेखील केल्या.
महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा मराठी विभागाच्या संयुक्त सहकार्याने महाराष्ट्राचे २५ वर्षांसाठीचे मराठी भाषा विषयक धोेरण, भाषा सल्लागार समितीचा २०१४ चा मसुदा यांवर चर्चा करण्याकरिता विद्यापीठ दृकश्राव्य सभागृहात चर्चासत्र झाले.
अध्यक्षस्थानी समिती सदस्य प्राचार्य डॉ. श्रीकांत तिडके, डॉ. प्रभा गणोरकर,मराठी भाषा उपसंचालक अरुण गोसावी, विशेष कार्यकारी अधिकारी नीलेश राठोड, डॉ. मनोज तायडे, कक्ष अधिकारी गणेश पुंड-देशमुख, डॉ. हेमंत खडके उपस्थित होते. इयत्ता पहिली ते चौथी शाळेतील शिक्षण मराठीतून अनिवार्य व्हावे, धोरण राबवण्यासाठी सक्षम यंत्रणा निर्माण करावी, प्रादेशिक मराठी भाषेला महत्त्व, स्वतंत्र संकेतस्थळ सुरू करून त्यामध्ये प्रादेशिक भाषेचे शब्द, त्याचे उच्चार अर्थ देण्याची व्यवस्था निर्माण करण्याबाबत सूचना केल्या. डॉ. प्रभा गणोरकर यांनी मसुद्यावरमत व्यक्त केले. मराठी भाषा मागे पडली. ती ज्ञानभाषा व्हावी, यासाठी मराठी भाषाविषयक धोरण अधिक प्रभावशाली राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी मराठी भाषाविषयक धोरणाच्या मसुद्यावर खुली चर्चा केली. या चर्चेत प्रा. महेंद्र गिरी, जनसंपर्क अधिकारी विलास नांदुरकर, डॉ. मोना चिमोटे, यांनी चर्चे भाग घेतला. डॉ. मनोज तायडे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी अरुण गोसावी नीलेश राठोड यांनी मत व्यक्त केले. डॉ. हेमंत खडके यांनी सूत्रसंचालन, डॉ. प्रणव कोलते यांनी आभार मानले.

चक्रधर स्वामी मराठी भाषा विद्यापीठाची मागणी-
मराठीभाषा विद्यापीठ अमरावती जिल्ह्रातील रिद्धपूर येथे स्थापन व्हावे, त्या विद्यापीठाला स्वामी चक्रधर मराठी भाषा विद्यापीठ असे नाव देण्याचे धोरणात नमूद करावे, महाराष्ट्रातील विद्यापीठांचे अध्यादेश, परिनियम, विनियम, नियम, कायदा यांसह इतर सरकारी विभागांचे नियम मराठी भाषेत तयार करावे, वेबसाइट ई-मेल यांसह इलेक्ट्रॉनिक्स संदेशवहन मराठीत करण्याची प्रक्रिया सुलभ करावी, मुलाखत ही मराठी भाषेतच घेणे अनिवार्य करावे, बोलीभाषा आणि प्रमाण भाषा यात जवळीक निर्माण व्हावी, मराठीचे की बोर्डस् सर्वत्र एकच असावेत, रिद्धपूर येथील पोथ्यांचे डिजिटायझेशन व्हावे, मराठी भाषा संवर्धन, वाचनसंस्कृती वाढावी यासाठी सार्वजनिक ग्रंथालय अधिक सक्षम करावे, मराठी व्याकरणाचा स्वतंत्र विषय अभ्यासक्रमात असावा, यांसह मराठी भाषाविषयक अनेक मुद्द्यांवर सूचना मांडल्या.