आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Transport News In Marathi, Amravati, Divya Marathi

एसटीला वर्षभरात एक कोटी 54 लाखांचा तोटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) अमरावती विभागास वर्षभरात (2013-14) तब्बल एक कोटी 54 लाखांचा तोटा झाला आहे. उत्पन्नाच्या तुलनेत खर्च अधिक होत असल्याने एसटीला हा फटका बसल्याचे सूत्रांकडून समजते.


अमरावती एसटीचे जिल्हाभरात आठ आगार असून, 416 बसेस प्रवासी सेवा देतात. डिझेलच्या दरातील प्रचंड वाढ, प्रत्येक मार्गावरील टोलनाके, कर्मचार्‍यांची वेतनवाढ आदी कारणांमुळे एसटीला खर्चाचा ताळेबंद घालणे कठीण जात आहे. सवलतीपोटी पाच कोटी मिळूनही तोटा दीड कोटींवर पोहोचला आहे. ‘एसटी’च्या एकूण उत्पन्नातील 96 टक्के रक्कम प्रवाशी तिकिटांमधून मिळते. या पार्श्‍वभूमीवर टोलनाक्यामधून एसटीला सूट मिळावी, यासाठी महामंडळाच्या अधिकार्‍यांनी मागील काही महिन्यांपासून पाठपुरावा चालवला आहे.


> 2012-13 मध्ये अमरावती महामंडळातील बसेस 516 लाख किलोमीटर चालली आहे. याचवेळी डिझेलसाठी चार कोटी 78 लाख खर्च झाला आहे. ऑइलसाठी 45 लाख 64 हजार, स्पेअर पार्टसाठी 20 लाख रुपये, टोलनाक्यासाठी 81 लाख रुपये आणि वेतनापोटी चार कोटी 87 लाख रुपये खर्च झाला आहे.


> 2013-14 मध्ये अमरावती जिल्ह्यातील एसटी 509 लाख किलोमीटर चालली आहे. डिझेलसाठी एक कोटी 22 लाख रुपये अतिरिक्त खर्च झाला. टायर ट्यूबसाठी पाच कोटी, 23 लाखांचा अतिरिक्त खर्च झाला. टोलनाक्यासाठी एक कोटी 62 लाख रुपये खर्च झाला आहे. 2012-13 मध्ये यासाठी 81 लाखांचा खर्च झाला होता; तसेच वेतनापोटी पाच कोटी 23 लाख रुपये खर्च झाला. एकूण, 17 कोटी 23 लाख रुपये खर्च झाला असून, 11 कोटी 94 लाख रुपयांचे उत्पन्न आहे.
> 2012-13 या आर्थिक वर्षात एसटीचे उत्पन्न 11 कोटी 28 लाख, तर खर्च 15 कोटी 28 लाख होता. त्यावर्षी शासकीय सवलतवजा केल्यानंतर 78 लाखांचा तोटा झाला. यंदा या तोट्यात दुपटीने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये 11 कोटी 94 लाख रुपये उत्पन्न असून, 17 कोटी 23 लाख रुपये खर्च झाला आहे. पाच कोटी रुपयांची सवलत वजा केल्यानंतरही एक कोटी 54 लाखांचा तोटा यावर्षी अमरावती महामंडळाला सहन करावा लागला आहे.


उत्पन्नवाढीसाठी महामंडळाचे प्रयत्न
* प्रवाशांना चांगली सुविधा देणे
* बसमधील स्वच्छता अधिक चांगली राखणे
* जादा बसेस सोडणे
* प्रवाशांसोबत अधिक सौजन्याने वागणे


महामंडळाला तिकिटापासूनच उत्पन्न मिळते. त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगली सुविधा देणे, प्रवाशांची मागणी व गर्दी लक्षात घेता, जादा बसेस सोडणे, आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व आगार प्रमुखांना तसे आदेश देण्यात आले असून, विविध मार्गांनी उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न आहे. आर. एन. पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी.