आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhi Institute Of Rural Industry Ligation

सौर उर्जेच्‍या वापरामुळे व्यवसायाला आली गती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मानवी संस्कृतीच्या उदयापासून मातीची भांडी साथ देत आहेत, अशी मातीची भांडी तयार करणारे कुंभार देशाच्या कानाकोपऱ्यात आढळतात. मात्र, आधुनिक संसाधनांमुळे कुंभारांचे महत्त्व कमी होत आहे. पारंपरिक कामातील कुंभार समाज आजही आपली कला टिकवण्यासाठी धडपडत असून, सूक्ष्म, लघू मध्यम उद्योग मंत्रालयाद्वारे संचालित महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ रुरल इंडस्ट्रिलायझेशन (एमजीआयआरआय, एमगिरी) च्या शास्त्रज्ञांनी विकसित केलेले ‘सौर चाक आणि माती मळणी यंत्रामुळे कुंभार कला गतिमान होणार आहे.
कुंभार हा ग्रामीण अर्थव्यवस्थेतील महत्त्वाचा भाग असून, त्याची कला टिकवण्यासाठी एमगिरीच्या शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला. कुंभार कलेसाठी आवश्यक माती तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी माती मळणी यंत्र तयार केले आहे. या यंत्राच्या साहाय्याने काही तासांत तीन आठवडे पुरेल एवढी माती तयार करता येते. या मातीला फिरत्या चाकावरून हवा तसा आकार देण्यासाठी ‘शैलाव्हील’ तंत्रज्ञान विकसित केले. शैलाव्हील हे सौर ऊर्जेवर चालते. हे तंत्रज्ञान प्रायोगिक तत्त्वावर नागपूर जिल्ह्यातील पेठचे रहिवासी कुंभार मोतीराम आनंदराव खांदारे यांना दिले आहे. याशिवाय महाराष्ट्रातील वर्धा, चंद्रपूर, अकोला येथील एक-एक कुंभार आणि मध्य प्रदेश राज्यातील दोन ठिकाणी हे तंत्रज्ञान मोफत पुरवले आहे. हे तंत्रज्ञान ‘पेटंट’साठी पाठवल्याने इतर कुंभारांची माहिती उघड करण्यास तंत्रज्ञान विकसित करणारे एमगिरीचे वरिष्ठ वैज्ञानिक एस. पी. मिश्रा यांनी नकार दिला.
चारशेवॉटचे सोलर पॅनल : यातंत्रज्ञानासोबत एमगिरीने कुंभारांना दोनशे वॉट वीजनिर्मिती क्षमतेचे दोन सोलर पॅनल दिले आहे. या सोलर पॅनलवर ही यंत्रे चालतात आणि अधिकची ऊर्जा एका बॅटरीमध्ये साठवता येते. त्यामुळे दिवसरात्र काम करणे शक्य आहे.

मातीपासूनतयार केले गरिबांचे फ्रीज : नाशवंतपदार्थ टिकवण्यासाठी फ्रीज आवश्यक असते. परंतु, फ्रीजची किंमत सामान्य माणसाला परवडत नाही. सामान्यांची ही अडचण लक्षात घेऊन खांदारे यांनी मातीपासून एक छोटाचा ‘शीतल पॉट’ (एकप्रकारे फ्रीज) तयार केला. या शीतल पॉटमध्ये भाजीपाला, दुधासारखे पदार्थ सात दिवसांपर्यंत टिकवून ठेवता येते. या मातीच्या फ्रीजमध्ये ठेवलेला भाजीपाला सातव्या दिवशीही शेतातून आताच तोडल्यासारखा ताजा असतो, असा दावा खांदारे यांनी केला आहे. या फ्रीजची किंमत केवळ ३०० रुपये आहे, हे विशेष.
तिपटीने वाढले उत्पन्न : मोतीराम खांदारे
पूर्वीतीन फूट खोल खड्ड्यात उतरून हात आणि पायाने माती मळावी लागायची. त्यामुळे हातापायांना इजा होत होती. आता एमगिरीच्या मशीनमुळे हा त्रास कमी झाला आणि माती मळण्याची गती चांगली आहे. पारंपरिक चाकांमुळे मातीला आकार देताना वस्तू तुटायच्या आणि मोठे नुकसान व्हायचे. परंतु, सौर ऊर्जेवरील चाकामुळे माती वाया जात नाही आणि उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिल्यामुळे महिन्याला ४० ते ५० हजार रुपये मिळतात. हे उत्पन्न पूर्वीपेक्षा तिप्पट झाले अाहे, अशी माहिती मोतीराम खांदारे यांनी दिली.
मातीची भांडी तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवताना नागपूर जिल्ह्यातील पेठ येथील कुंभार कलावंत मोतीराम खांदारे

दीडशे प्रकारच्या आहेत वस्तू
मातीकाम हा वडिलोपार्जित व्यवसाय आहे. परंतु, पारंपरिक व्यवसायात जेमतेम उत्पन्न होते. त्यामुळे १९९९ मध्ये अशिक्षित मोतीराम खांदारे यांनी मातीपासून शोभेच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. आज खांदारे परिवार दीडशे प्रकारच्या विविध वस्तू तयार करते. या व्यवसायात मोतीराम खांदारे यांना त्यांचा मोठा मुलगा प्रमोद ( वय ३५ वर्षे) आणि गोपाल (वय २५ वर्षे) मदत करतात.