आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maintain The Tricolor Symbol Of National Integrity Honor Dear Life

राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक प्राणप्रिय तिरंग्याचा राखा सन्मान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने कागदी तिरंगी झेंडे शहरात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक भारतीयाला राष्ट्रध्वज फडकवण्याचा अधिकार बहाल केला. मात्र, काहीशा दुर्लक्षामुळे कागदाचे, प्लास्टिकचे झेंडे कुठेही पडतात. त्यांचा अनवधानाने का होईना, अवमान होतो. आपला प्राणप्रिय राष्ट्रध्वज इतरत्र पडणार नाही, त्याची अस्मिता जपली जाईल, याची काळी घेणे गरजेचे आहे.

स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनी हाती राष्ट्रध्वज घेऊन मिरवणारी हौशी चिमुकली असो किंवा चेहर्‍यावर स्टीकर लावून देशप्रेमाची भावना व्यक्त करणारे तरुण, सर्वांसाठी जणू आनंदाचा सणच असतो. मात्र, आपल्या राष्ट्रध्वजाचे महत्त्व एका दिवसापुरतेच र्मयादित न राहता त्याचा सन्मान आपण जपला पाहिजे. त्यामुळे शक्यतो लहान मुलांच्या हाती कागदी झेंडा देऊ नये. वाहनाला झेंडा लावायचा असल्यास तो उडून जाणार नाही याची आपण दक्षता घ्यायला पाहिजे, अशी मतं शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली आहेत.

‘विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा उंचा रहे हमारा’ या गर्वगीताप्रमाणे आपल्या राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची प्रत्येक अमरावतीकराने काळजी घ्यावी, याबाबत मान्यवरांनी तरुणाईला आवाहन केले आहे.

पालकांचे लक्ष असावे

राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. शक्यतो सार्वजनिक ठिकाणी ध्वजवंदन करावे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला क्षणिक आनंद साजरा करण्यासाठी लहान मुलांकडे झेंडे दिले जातात. मात्र, पालकांनी याकडे लक्ष ठेवायला पाहिजे. आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान आपली जबाबदारी आहे. राजाभाऊ मोरे, ज्येष्ठ नाट्यकर्मी