आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणिकरावांचा फटकार; काँग्रेसचे बंडकर्ते थंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - गेल्या 15 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात सुरू असलेले काँग्रेसमधील पदाधिका-यांचे बंड माणिकराव ठाकरे यांच्या एका फटकाराने मोडीत निघाले आहे. तीन तासांत माणिकरावांनी पदाधिका-यांना असे फटकारले की, सर्व पदाधिकारी अक्षरश: गारद झाले. विशेष म्हणजे आता या बंड करणा-या पदाधिका-यांनी आपली दिल्लीवारी वा-यावर सोडली असून, स्वत :ची तोंडेही बंद करून टाकली आहे.

काँग्रेसच्या जिल्हाभरातील दुय्यम फळीतल्या पदाधिका-यांनी बैठक घेऊन आपल्याच पक्षातील नेत्यांविरोधात बंड पुकारले होते. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना राजीनाम्याचा सल्ला देत प्रस्थापितांना उमेदवारी न देण्याची मागणीही त्यांनी केली. या घटनेमुळे काँग्रेसमध्ये खळबळ माजली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्ली येथे पक्षश्रेष्ठींकडे पाठवून आपण आता यापुढे निवडणूक लढणार नसल्याचे घोषित केले होते. अध्यक्षांच्या राजीनाम्याने पदाधिकारी खूश झाले. मात्र, वरिष्ठ स्तरावरील नेतेमंडळी या बंडामुळे असंतुष्ट होती. दिल्लीतून आदेश मिळताच ठाकरे यांनी आज यवतमाळ गाठले. गोपनीय पद्धतीने सर्व असंतुष्ट पदाधिका-यांना आपल्या बंगल्यावर बोलावले आणि 15 दिवसांपासून सुरू असलेले हे पदाधिका-यांचे बंड तीन तासांत संपुष्टात आणले. या बैठकीला बंड करणारे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी पदाधिका-यांना दिल्ली न जाण्याचे सुचवण्यात आले. एवढेच नव्हे, तर थेट पत्रकारांसमक्ष पक्षातील अंतर्गत बाब उघड केल्याने माणिकरावांनी नाराजी दाखवल्याचे वृत्त आहे. आता मात्र जिल्हाभरातील असंतुष्ट पदाधिकारी माणिकरावांचा ‘कान’मंत्र ऐकून घरी परतले आहे.
दोन्ही तिकिटे कॅन्सल
बंड करणा-या पदाधिका-यांनी दिल्ली येथे जाण्यासाठी रेल्वेची तिकिटे बुक करून ठेवली होती. ही सर्व तिकिटे आता कॅन्सल करण्यात आले आहेत. राखीव मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी ज्यांना उमेदवारीची अपेक्षा होती, त्यांची उमेदवारीसुद्धा रद्द झाल्याची टीका ठाकरे यांच्या घरासमोर जमलेले आमदार गटातील काँग्रेस कार्यकर्ते करत होते. पदाधिका-यांची दोन्ही तिकिटे रद्द झाल्याची कॉमेन्ट्स करताच माणिकरावांच्या घरासमोरच हास्याचे फवारे उडाले.

नाराज पदाधिका-यांना फटकारले बैठकीत
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 11 वाजता बंगल्यावर बैठक सुरू झाली. या वेळी अशोक बोबडे, देवानंद पवार, बाळासाहेब मांगुळकर, मोहम्मद नदीम, अरुण राऊत, वजाहत मिर्झा यांच्यासह अनेक नाराज पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत माणिकरावांनी सर्व पदाधिका-यांची चांगलीच कानउघाडणी केली. तसेच सगळ्यांचे म्हणणे कान देऊन ऐकल्याचे वृत्त आहे. या पदाधिका-यांच्या समस्या ऐकल्यानंतर त्याचेही निराकरण करणार असल्याची ग्वाही दिली असली, तरी यापुढे पदाधिका-यांना आमदारांकडून खरच सन्मान मिळतो की, सापत्नपणाची वागणूक मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजीनामा झाला ना मंजूर
काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार वामनराव कासावार हेच कायम राहणार आहेत. पक्षाचे आदेश पाळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. प्रदेशाध्यक्षांनी त्यांना राजीनामा न देता कायम राहण्याच्या सूचना दिल्याने कासावार पुन्हा अध्यक्ष पदावर स्थिर झाले आहे.

पदाधिकारी झाले चिडीचूप
15 दिवसांपासून आपल्याच नेत्यांच्या विरोधात बोंबा मारणा-या पदाधिका-यांची तोंडे आता बंद झाली आहेत. एकही पदाधिकारी प्रतिक्रिया देण्यासाठी तयार नाही. माणिकराव ठाकरे सांगतील एवढीच प्रतिक्रिया अनेकांनी दिली. काहींनी आपल्या तोंडासोबतच स्वत:चे मोबाइलसुद्धा बंद करून टाकले.

आमदारांची बैठक घेणार
- पदाधिका-यांच्या समस्या, नाराजी आपण ऐकून घेतली. आता आमदारांचीसुद्धा बैठक घेऊन त्यांचेही म्हणणे ऐकून घेणार आहे. पदाधिका-यांची नाराजी आता दूर झाली आहे. सर्वजण एकत्रित राहून येणा-या विधानसभा निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणार आहो.
माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र.