आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manish Pethe Dead Case Four Polce Suspend Amaravati

चार पोलिस अधिकार्‍यांसह सात पोलिस झाले निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - मनीष पेठे मृत्यूप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा पोलिस आयुक्त अजित पाटील यांनी चार पोलिस अधिकार्‍यांसह सात कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. चौकशीत हे सात जण दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

गुरुवंदना अपार्टमेंटवर जुगार सुरू असल्याच्या माहितीवरून गाडगेनगर ठाण्यातील हे पोलिस धाड टाकायला गेले असता, मनीष पेठे इमारतीच्या तिसर्‍या माळ्यावरून पडले होते. या वेळी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल न करता घटनास्थळावरून पळ काढला होता. बुधवारी एसीपी लतीफ तडवी आणि पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्या चौकशी अहवालात हे अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळून आले.

सहा सप्टेंबरला तत्कालीन ठाणेदार सोळंके यांच्या आदेशावरून तीन उपनिरीक्षक व तीन कर्मचारी त्या ठिकाणी गेले होते. तिसर्‍या मजल्यावरील पेठे त्याचदरम्यान खाली पडले व डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनाक्रम घडला त्या वेळी तीन अधिकारी व तीन पोलिस कर्मचारी घटनास्थळावर हजर होते. पोलिसांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. यानंतर आयुक्तांनी एसीपी लतीफ तडवी आणि पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांच्याकडे चौकशी दिली होती.

यांच्यावर झाली कारवाई
गाडगेनगरचे तत्कालीन ठाणेदार पोलिस निरीक्षक गुलाबराव सोळंके, उपनिरीक्षक अरविंद पवार, भगवान कोळी, परीविक्षाधीन उपनिरीक्षक जितेंद्र ठाकूर, पोलिस हवालदार संजय सरोदे, ईशय खांडे आणि प्रदीप कावरे यांचा निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे.

पोलिसांना मागितला ‘से’
पेठे कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिके वरूनच न्यायालयाने पोलिसांना ‘से’ मागवला आहे. यामुळेच आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. हायकोर्टाने मागितलेल्या ‘से’ ला उत्तर देणार असून, अधिकार्‍यांच्या अहवालावरून निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.