आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहासाठी जुळावे विचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- आधुनिक युगात सोशल नेटवर्किंग साइटमुळे जग जवळ झाले आहे; तरीही वैवाहिक परिचय संमेलन हे विचार जुळण्याचे उत्तम माध्यम असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी ( दि. 4) व्यक्त केले.

काकासाहेब कोहळे स्मृती चॅरिटेबल ट्रस्टद्वारे संचालित आयडियल मॅरेज ब्युरो अँड मॅरेज काउन्सेलिंग सेंटर व स्टुडंट अँड पॅरेंट्स काउन्सेलिंग सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने टाउन हॉल येथे आयोजित मराठा समाजातील चौथ्या विश्वव्यापी वैवाहिक परिचय संमेलनाचे उद्घाटन आमदार बोंडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते पुढे म्हणाले, इंटरनेटच्या माध्यमातून मुला-मुलींचा परिचय होतो.

दरम्यान, दूरध्वनीवरून संपर्कदेखील करण्यात येतो. मन आणि मेंदूच्या माध्यमातून हे विवाह जुळवले जातात. तथापि, सुखी संसाराचा गाडा हा एकमेकांचे विचार जुळल्यावरच व्यवस्थितरीत्या चालू शकतो. त्यासाठी वैवाहिक संमेलनाचे आयोजन महत्त्वाचे आहे. याशिवाय विवाहेच्छुक मुला-मुलींनी तसेच त्यांच्या पालकांनी परिचय संमेलनाविषयी असलेली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. मानसिकता बदलली, तरच संमेलन यशस्वी होईल.

याप्रसंगी डॉ. विवेक गोहाड म्हणाले, पालकांनी गुण, कुंडलीपेक्षा आरोग्य कुंडली बघून स्थळांची निवड करावी. आरोग्य चांगले राहील, तरच संसाराची चाके डगमगणार नाहीत. समाजातील विवाहविषयक अयोग्य चालीरीती, रूढी, परंपरा, हुंडा, मानपानविषयक अपेक्षा तसेच गुणमिलन, कुंडली, मंगळ यांबाबतचे समज-गैरसमज अशा संमेलनांच्या माध्यमातून दूर होत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. त्यामुळे नातेसंबंध दृढ होऊन ते निकोप राहण्यास मदत होत असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

संमेलनात पाटील, देशमुख, मराठा, 96 कुळी तसेच कुणबी समाजातील इच्छुक मुले-मुली व पालकांनी मान्यवरांच्या उपस्थितीत परिचय दिला. या वेळी जवळपास ऐंशी जणांनी संमेलनात नावनोंदणी केली.

कार्यक्रमाचे औचित्य साधून परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळादेखील या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाला माजी आमदार सुलभाताई खोडके, शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महादेव भुईभार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वसुधा बोंडे, जिजाऊ बँकेचे अध्यक्ष अरविंद गावंडे, मातोर्शी डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक अनिल वानखडे, डॉ. विवेक गोहाड व नानासाहेब बोके उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैशाली कोहळे तर आभार व संचालन चंद्रशेखर कोहळे यांनी केले. कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती होती.


उपवर परिचय पुस्तिकेचे झाले प्रकाशन
आयडियल मॅरेज ब्युरोच्या वतीने या वेळी मान्यवरांच्या हस्ते उपवर युवक-युवती परिचय पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेत अभियांत्रिकी, डॉक्टर, एल.एल.बी., एल.एल.एम., बी.एस्सी., बी. कॉम., फाइन आर्ट्स व डी. एड., बी. एड. अशा विविध शाखांमध्ये शिक्षण झालेल्या उच्चशिक्षित; त्याचप्रमाणे घटस्फोटित व पुनर्विवाहास इच्छुक मुला-मुलींचा संपूर्ण व सखोल परिचय दिला आहे.