आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayawati News In Marathi, Bahujan Samaj Party, Lok Sabha Election

काँग्रेस, भाजपला सत्तेपासून रोखा,अमरावतीच्या सभेत मायावती यांचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - लोकसभेच्या सोळाव्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला सत्तेत येण्यापासून रोखा, असे जाहीर आवाहन बहुजन समाज पक्षाच्या नेत्या, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी अमरावतीत गुरुवारी केले. गुजरातमध्ये दंगे घडवल्याचा आरोप असलेले नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले, तर पुढचा पंतप्रधान ‘युवराज’ होईल अशी काँग्रेसला आशा आहे, असे सांगत मायावती यांनी पंतप्रधानपदाच्या दोन्ही उमेदवारांना विरोध दर्शवला.


विदर्भातील बसपच्या 10 उमेदवारांच्या प्रचाराकरिता मायावती यांची अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर सभा झाली. या सभेत मायावती यांनी काँग्रेस आणि भाजपला लक्ष्य केले. स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊनही देशात गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलली नाही. गरीबी वाढली आहे अन् भ्रष्टाचार बोकाळला आहे. विद्यमान सत्ताधार्‍यांनी राबवलेल्या योजनांचा सर्वसामान्यांना कसलाही फायदा झाला नाही. देशाच्या आजच्या हलाखीच्या परिस्थितीला फक्त काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची पत आंतरराष्ट्रीय समुदायात घसरली. अद्यापही विदेशातील काळा पैसा भारतात आणण्यात काँग्रेस सरकारला यश आले नाही. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केलेले कायदे कुचकामी आहेत, असे त्या म्हणाल्या.


भांडवलदारांच्या हाती सत्तेच्या चाव्या : देशात भांडवलदार, उद्योजक आणि ‘धन्नासेठ’ यांच्याकरिताच कायदे बनवण्यात येतात. त्यांच्या मदतीनेच केंद्रात काँग्रेस, भाजपने आतापर्यंत सत्ता हस्तगत केली. त्यांच्यापासून सुटका करायची असेल, तर आता सोळाव्या लोकसभेत काँग्रेस, भाजप दोघांनाही सत्तेपासून रोखण्याची संधी आहे, असे मायावती म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडित आणि दलितांकरिता आरक्षण कायदा लागू करून सुविधा दिल्यात. मात्र, सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने नवनवे नियम लादून दलित जनतेचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. दलितांसाठी सरकारी नोकरीत असलेले आरक्षण हळूहळू संपवण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोप मायावती यांनी केला.


जाहीरनाम्यावर विश्वास ठेवू नका : लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मायावती यांनी केले. देशात सहा वर्षे भाजपचे सरकार होते, मग त्यावेळी त्यांनी देशात सुधारणा का केल्या नाहीत? बहुजन समाज पक्षाच्या वतीने कधीही निवडणुकीत जाहीरनामा प्रकाशित करण्यात येत नाही. आम्ही विकास करून दाखवतो, असे मायावती यांनी स्पष्ट केले.


विदर्भातील दहा उमेदवारांची उपस्थिती : जाहीर सभेला गुणवंत देवपारे (अमरावती), बळीराम राठोड (यवतमाळ-वाशीम), बी. सी. कांबळे (अकोला), अ. हफीज अ. अजिज (बुलडाणा), डॉ. मोहन गायकवाड (नागपूर), चेतन पैदाम (वर्धा), किरण पाटणकर (रामटेक), रामराज नन्नावरे (गडचिरोली), संजय नासरे (भंडारा), हंसराज कुंभारे (चंद्रपूर) हे बसपचे विदर्भातील दहाही उमेदवार उपस्थित होते.
दहा वर्षांनंतर झाले अमरावतीत आगमन : यापूर्वी 2004 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी मायावती अमरावतीत आल्या होत्या. तब्बल दहा वर्षांनंतर त्या पुन्हा अमरावतीला आल्याने कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.