आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परीक्षा ‘पोस्टपोन’; मेडिकलच्या हजारो विद्यार्थ्यांना फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- पेपर फुटल्याने पॉलिटेक्निकचा अँप्लाइड मॅथमॅटिक्स विषयाचा पेपर रद्द केल्याची घटना ताजी असतानाच नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कर्मचारी संपावर गेल्याने मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जिल्हाभरातील मेडिकल कॉलेजेसला शनिवारी रात्री उशिरा याबाबत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने कळवले आहे.

कर्मचार्‍यांच्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्याने प्रशासनाने परीक्षा पुढे ढकलल्याचा फटका शहरातील आठ मेडिकल कॉलेजेसमधील विद्यार्थ्यांना बसणार आहे. दिवाळी आटोपताच मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रात्यक्षिक परीक्षांची धावपळ सुरू होती. त्यानंतर लगेचच म्हणजे 26 नोव्हेंबरपासून लेखी परीक्षा नियोजित होत्या; परंतु ऐनवेळी कर्मचार्‍यांनी आंदोलनात्मक भूमिका घेतल्याने व त्यावर तोडगा न निघाल्याने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने सर्व विषयांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. या निर्णयामुळे पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचा परिणाम फेरमूल्यांकनावरदेखील होणार आहे.

आठ कॉलेजेसला फटका

शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय, तखतमल श्रीवल्लभ होमिओपॅथी कॉलेज, पीजेएन मेमोरिअल होमिओपॅथी कॉलेज, श्री गुरुदेव आयुर्वेद कॉलेज, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे डेन्टल कॉलेज, डॉ. पंजाबराव देशमुख नर्सिंग कॉलेज, डॉ. पंजाबराव देशमुख डीएमएलटी कॉलेजमधील विद्यार्थ्यांना विद्यापीठ कर्मचारी आंदोलनाचा फटका बसणार आहे.

इंजिनीअरिंगची परीक्षा जोरावर
मेडिकल आणि पॉलिटेक्निकच्या परीक्षांबाबत गोंधळाचे वातावरण असतानाच इंजिनीअरिंगच्या विद्याशाखांची परीक्षा सुरळीतपणे सुरू आहे. नऊ नोव्हेंबरपासून या परीक्षांना सुरुवात झाली आहे. आता ही परीक्षा पूर्ण जोरावर आहेत. सिव्हिल इंजिनीअरिंगच्या जिओटेक्निकल इंजिनीअरिंग-1 विषयापासून परीक्षांना सुरुवात झाली. डिसेंबर अखेरपर्यंत या परीक्षा चालणार आहेत.

विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आंदोलनावर तोडगा निघताच सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाईल. त्याबाबत कॉलेजेसला कळवले जाईल. डॉ. अरुण जामकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

आंतरविद्यापीठ क्रीडा स्पध्रेवरही परिणाम
कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनामुळे नाशिक येथे होऊ घातलेल्या आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांवरही अनिश्चिततेचे ढग घोंघावत आहेत. यंदा नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठ आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे यजमानपद भूषवत आहे. कर्मचारीच कामावर नसल्याने स्पर्धांचे आयोजन करावे कसे, असा पेच प्रशासनाला पडला आहे.

‘लॉ’चा दुसरा टप्पा सोमवारपासून
विधि विद्याशाखेच्या दुसर्‍या टप्प्यातील परीक्षांना 25 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी पहिल्या टप्प्यातील परीक्षा ऑक्टोबरमध्ये पार पडल्या आहेत. त्यात इंग्रजी, अर्थशास्त्र या विषयांचा समावेश आहे. उर्वरित सर्व विषयांची परीक्षा आता सोमवारपासून होणार आहे.