आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष - मीटरद्वारे पाणीपुरवठा करणारे जिल्ह्यातील पहिले गाव पातूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - घराघरांत अधिकृत नळजोडणी, प्रत्येक नळाला पाण्याचे मीटर बसवून नियमित बिल वाटप आणि वाटप झालेल्या पाणी बिलाची शंभर टक्के वसुलीसोबतच संपूर्ण गाव हगणदारी मुक्त करण्याचा बहुमान मोर्शी तालुक्यातील पातूर या गावाला मिळाला आहे. मीटरद्वारे पाणीपुरवठा करणारे जिल्ह्यातील पहिले गाव म्हणून पातूरची जिल्हा परिषदेच्या इतिहासात नोंद झाली आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा योजना, पंचायत समिती, पातूर ग्रामपंचायतीने अनेक वर्षांपासून चालवलेल्या सामूहिक प्रयत्नांचे यश म्हणून पातूरमधील एकूण-एक घरात ग्रामपंचायतीचे अधिकृत नळ कनेक्शन लागले आहेत. इतकेच नव्हे, तर प्रत्येक नळाला मीटर बसवून पाणीपुरवठाही सुरू झाला आहे. आता जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये अशाच प्रकारे मीटरने पाणीपुरवठा करण्याचे ‘टार्गेट’ जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने डोळ्यांपुढे ठेवले आहे.

वर्षभरात लागतील आणखी मीटर
आगामी वर्षात आणखी तीन ते चार गावांत मीटरने पाणीपुरवठा करण्यावर झेडपीचा भर आहे. त्यासाठी राजकीय मदतही घेण्यात येणार आहे. संभाव्य विरोधाला संवादाच्या माध्यमातून संमतीत परिवर्तीत करण्याचे प्रयत्नही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सुरू केले आहेत.

२०२० पर्यंत भूजलाचा वापर कमी
आगामी पाच वर्षांत भूजलाचा वापर जिल्ह्यात कमीत कमी करण्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा भर राहणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींना विविध प्रकल्पांमधून पाणी घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. प्रकल्पांमधून मिळणाऱ्या पाण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेला जलसंपदा विभागाला पैसे मोजावे लागतील.
पाण्याचे आरक्षणही करावे लागेल. त्यासाठी जोवर पाणीपट्टीची पूर्णपणे वसुली होणार नाही, पाणी चोरी थांबणार नाही तोवर पाणीपट्टीचे उत्पन्न वाढणेही शक्य नाही. त्यासाठीच ग्रामीण भागात घरांमध्ये मीटरने पाणीपुरवठा करण्याचे ‘टार्गेट’ डोळ्यांपुढे ठेवण्यात आले आहे.