आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महत्त्वकांक्षी प्रकल्प; अमरावती ‘एमआयडीसी’त साकारणार ‘ड्राय पोर्ट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावतीस्थित नांदगावपेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये ‘ड्राय पोर्ट’ प्रकल्प लवकरच साकारला जाणार आहे. 15 ते 20 हजार कोटी रुपये मूल्य असलेला प्रकल्प साकारण्याच्या दृष्टीने केंद्र शासन स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती खासदार आनंदराव अडसूळ यांनी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे शनिवारी (2 ऑगस्ट) रात्री पार पडलेल्या ‘समृद्ध अमरावती’ या कार्यक्रमात दिली.
राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या नांदगावपेठ पंचतारांकित औद्योगिक परिसरात महत्त्वाकांक्षी इंडिया बुल्स औष्णिक वीज प्रकल्प उभा झाला आहे. त्यानंतर ‘ड्राय पोर्ट’ हा मोठा प्रकल्प राहणार आहे. रेल्वे डब्यांचे सुटे भाग, जहाज बांधणीसाठी आवश्यक असलेले सुटे भागांची निर्मिती या कारखान्यातून केली जाणार आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला प्रकल्प अमरावतीत साकार करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रयत्नरत असल्याचे खासदार अडसुळांनी स्पष्ट केले. 15 ते 20 हजार कोटी रुपयांचे बजेट असलेला प्रकल्प नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये निर्माण झाल्यास अमरावती जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. इंडिया बुल्स कंपनीच्या वीज प्रकल्पांतर्गत रेल्वेचे इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण झाले आहे. या रेल्वे मार्गाचा एमआयडीसीच्या विकासासाठी उपयोग होणार आहे. मुबलक जमीन उपलब्ध असल्याने ‘ड्राय पोर्ट’ प्रकल्प साकारण्याच्या दृष्टीने निर्णय घेणे सुविधाजनक होणार आहे. मोठा प्रकल्प असल्याने स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कार्यकाळात तसेच त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालेला सेझ प्रकल्प असताना नांदगावपेठ एमआयडीसीचा विकास होऊ शकला नाही. शिवाय सेझ साकारण्याची जबाबदारी असलेल्या एल्डेको कंपनीनेदेखील येथून काढता पाय घेतला होता. मात्र, इंडिया बुल्स कंपनीच्या औष्णिक वीज प्रकल्पामुळे नांदगावपेठ एमआयडीसीची नव्याने ओळख निर्माण होत आहे. ‘ड्राय पोर्ट’ची निर्मिती झाल्यास येथील विकासाला चालना मिळणार आहे.