आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्र्यांसमक्ष आत्मदहनाचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-प्रजासत्ताकदिनी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था भेदून एका बँकेच्या माजी कर्मचार्‍याने जिल्हा स्टेडियमवर आत्मदहनाचा प्रयत्न केला. जानराव र्शीधर गोंडाणे असे त्यांचे नाव असून, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने बेरोजगार केल्याचा त्यांचा आरोप आहे.
जिल्हा स्टेडियमवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर सकाळी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. गोंडाणे यांनी अंगावर रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, बंदोबस्तातील पोलिस कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. विशेष पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी, पोलिस आयुक्त अजित पाटील, विभागीय आयुक्त दत्तात्रय बनसोड, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांच्यासमक्षच हा प्रकार घडला.
1995 च्या दरम्यान गोंडाणे हे सेंट्रल बँकेत कर्मचारी म्हणून कार्यरत होते. बँकेने गोंडाणे यांच्यासह सात कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले. पदे रिक्त असतानाही बँकेने आश्वासने पाळली नाहीत, असा गोंडाणे यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांना आत्मदहनाची नोटीस दिली होती, अशी माहिती आहे. त्यामध्ये आत्मदहन नागपूरला करणार असल्याचे नमूद होते. प्रजासत्ताकदिनी झालेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे पोलिस प्रशासन अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर आत्मदहनाची नोटीस दिल्यानंतरही पोलिसांनी सतर्कता का बाळगली नाही, असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकरणी गोंडाणे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गाडगेनगर पोलिस ठाण्यामध्ये भादंविच्या 309 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने अमरावतीकर अवाक् झालेत.