आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरवलेली तीन वर्षीय अक्षरा पोहोचली सुखरूप घरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(माता पित्याच्या कुशीत सुखरूप पोहोचली तीन वर्षीय अक्षरा )
अमरावती- तीन वर्षीय ‘अक्षरा’ अचानक बडनेरा एस टी स्टॅंड समोरून दिसेनाशी झाली आणि तीचा मामा श्रीकृष्ण पारीसे यांच्या हृदयाचे ठोकेच वाढले. लहानशी चिमुरडी गेली तरी कुठे या भितीने तिच्या मामांना चांगलेच घेरले.
अक्षरा सापडली नाही तर बहिणीला काय उत्तर देऊ ? या चिंतेत मामाने भाचीचा शोध घेण्यास सुरूवात केली. मात्र आसपास कुठेही अक्षरा दिसत नव्हती. बडनेरा एस टी स्टॅंड वरून अक्षरा ला घेऊन मामा श्रीकृष्ण जुन्ना जावरा या गावी बुधवारी(दि.२४ जुन) निघाले होते.
गावाकडे जाणा-या एका आटोरीक्षा जवळ अक्षराला उभी करून मामा काहितरी कामाकरीता नजिकच गेले. मात्र तेवढ्याच कालावधीत अक्षरा आणि मामाची वाट चुकली. चांदुर बाजार नजीक बेलोरा येथून बहिणीच्या घरून अक्षराला घेऊन मामा निघाले होते. घडलेली आपबिती मामाने बहिण प्रमिला कुरवाळे आणि जावई गणेश कुरवाळे यांना सांगितली.
लहान चिमुरडीला कोणी आणि कुठे नेले याचा शोध घेण्याकरीता मामाने बडनेरा पोलीस स्टेशन गाठले. विचारपुस केली. तेव्हा मामाचा जिव भांड्यात पडला. एस टी स्टॅड परिसरात लहानशी मुलगी एकटीच असल्याचे बघून एका सज्जन गृहस्थाने अक्षराला पोलीस स्टेशन ला पोहोचवून दिले होते. मात्र अक्षराचे वय वर्ष तीन असल्याने पोलीसांनी जराही वेळ गमावता १०९८ या क्रमांकावर फोन करून चाईल्ड लाईनचे अधिकारी महादेव कुऱ्हेकर यांच्या हवाली अक्षराला केले होते. तेथून अक्षराला चाईल्ड लाईनच्या गाडगेनगर येथील वसतीगृहात नेले, असे चाईल्ड लाईनचे महादेव कुऱ्हेकर यांनी सांगितले. अक्षरा सुखरूप असल्याचे कळताच आई वडीलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
शुक्रवारी केले आई वडिलांच्या स्वाधीन
आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर चाईल्ड लाईन कडे सुखरूप असलेल्या अक्षराला शुक्रवारी(दि.२६ जुन)तिच्या माता पित्यांच्या हवाली करण्यात आले. हरविलेल्या मुलीच्या चिंतेत असलेले परिवारातील २० ते २५ सदस्य लाडक्या अक्षराला गावी नेण्यास आले होते. यावेळी अक्षरा सुखरूप सापडल्याचा आनंद प्रत्येकच सदस्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.
बातम्या आणखी आहेत...