आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनाचे ‘मिशन लोकसभा’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- एरव्ही आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर आवाज बुलंद करणारे अधिकारी-कर्मचारी रविवारी वेगळ्या कारणासाठी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले होते. निवडणूक आयोगाने सूचवलेल्या निर्देशबरहुकूम त्यांनी केलेली ही कृती मतदार जागृतीसाठी होती. मतदारांना त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी या वेळी पहिल्यांदाच अशी फेरी काढण्यात आली.
येत्या 10 एप्रिल रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी राजकीय व सामाजिक मंच आपापल्या परीने प्रयत्नरत आहेतच; परंतु यावर्षी पहिल्यांदा हे कर्तव्य अधिकारी व कर्मचार्‍यांनीही बजावावे, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अमरावती व बडनेरा विधानसभा क्षेत्र मिळून आज (रविवारी) सकाळी विविध पाच ठिकाणांहून फेरी काढण्यात आली. फेरीचा एक गट विभागीय आयुक्त दत्तात्रय बनसोड व पोलिस आयुक्त डॉ. सुरेशकुमार मेकला यांच्या उपस्थितीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून निघाला. या गटात विविध दहा अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
शेगाव नाका, जयस्तंभ चौक, एमआयडीसी, रुक्मिणीनगर असे मार्गाक्रमण करत हा गट सकाळी नऊच्या सुमारास जिल्हा स्टेडियममध्ये पोहोचला. फेरीच्या दुसर्‍या गटात महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते. हा गट मनपा इमारत, रामपुरी कॅम्प मार्गे जिल्हा स्टेडियमला पोहोचला. त्याचवेळी भातकुली तहसील, भातकुली पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालयाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचा समावेश असलेला तिसरा गट मालवीय चौकातून पठाण चौक, वलगाव रोड मार्गे स्टेडियमवर पोहोचला. चौथी फेरी जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्या नेतृत्वात त्यांच्या कार्यालयातून निघून स्टेडियमवर आली होती.
सर्व फेरींचा मैदानात झालेला जमाव विशाल आयोजनाची साक्ष देत होता. जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी मतदानासाठीच्या संकल्पाचे वाचन केले. उपायुक्त माधवराव चिमाजी व इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन उपजिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र धुरजड यांनी केले. आयोजनात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एनएसएस विभागाचे समन्वयक प्रा. र्शीकांत पाटील व महसूल यंत्रणेतील सर्व एसडीओंचा महत्त्वाचा सहभाग होता.