आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोकरीच्या नावावर केली 149 जणांची फसवणूक, आमदार बोंडे यांनी उघडकीस आणले प्रकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याच्या नावाखाली इंडिया बुल्स कंपनीने 149 बेरोजगार युवकांची फसवणूक केल्याचे प्रकरण आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी नुकतेच उघडकीस आणले आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना सोपवली असून, दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


डॉ. बोंडे यांच्या निवेदनानुसार, पॉवर प्लांटमध्ये नोकरी देतो, असे म्हणत कंपनीने अनेकांकडून छापील अर्ज भरून घेतले. प्रत्येकाने या अर्जाची एक-एक प्रत त्यांच्याकडेही पाठवली. 10 फेब्रुवारीपर्यंत त्यांच्याकडे असे 149 अर्ज प्राप्त झाले. त्यासोबत जोडलेली कागदपत्रे, त्यासाठी केलेला टपालखर्च, प्रत्येकाचे वैयक्तिक निवेदन आदी सर्व बाबी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना समजावून सांगितल्या; शिवाय ज्यांनी हे काम केले, त्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही केली.


प्रभारी जिल्हाधिकारी किशोर कामुने यांच्या दालनात झालेल्या या चर्चेदरम्यान कंपनीचे प्रतिनिधी म्हणून निवृत्त उपायुक्त सुरेश इंगोले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. के. पुरी, एमआयडीसीचे व्यवस्थापक देशमुख आदी अधिकारीही उपस्थित होते. कामुने यांनी या वेळी आमदार बोंडे यांच्या मागणीच्या अनुषंगाने तत्काळ कारवाईचे आश्वासन दिले. निवेदन देताना नीळकंठ मुरूमकर, गजानन डहाके, तृप्ती बोडके आदी कार्यकर्ते व प्रकल्पग्रस्तांचे काही प्रतिनिधी उपस्थित होते.