आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती - अमरावती मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत यांना झालेल्या मारहाणीतून काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा संघर्ष उद्भवण्याची चिन्हे दिसत आहेत. घटनेला पाच दिवस उलटूनही राष्ट्रवादी काँग्रेसने हे प्रकरण गांभीर्याने घेतले की नाही, याबाबत काँग्रेसमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कॉँग्रेसने केलेली पोलिस आयुक्तांच्या बदलीच्या मागणीबाबत राष्ट्रवादीच्या संमतीशिवाय निर्णय घेणे अशक्य असल्याने काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असे स्वरूप येण्याची शक्यता आहे. पोलीस विभाग हा गृहखात्याशी संबंधित असून हे खाते राष्ट्रवादीकडे आहे. त्यातच खुलेआम झालेल्या या मारहाणीला पोलिसांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे की शेखावत यांच्या अंतर्गत वादातून हे प्रकरण उद्भवले, याबाबत सखोल तपास केल्यानंतरच गृहविभागाने निर्णय घेण्याचे ठरवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दहीहंडीसारख्या सार्वजनिक कार्यक्रमात लोकप्रतिनिधींवर अशाप्रकारे हल्ला होणे ही बाब निषेधार्ह आहे. या हल्ल्याचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस यंत्रणा करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माहासचिव संजय खोडके हे या दहीहंडीच्या कार्यक्रमाचे मुख्य पुरस्कर्ते असल्याने या मंचावर झालेल्या मारहाणीबाबत नेमकी काय भूमिका घ्यावी, असा पेच राष्ट्रवादीपुढे आहे. गजेंद्रकडून शेखावतांना धोका निर्माण झाला आहे याबाबत पोलिसांना माहिती होती का, गजेंद्र हा कधीही हल्ला करू शकतो याबाबत शेखावतांकडून यापूर्वी पोलिसांना सूचना देण्यात आली होती का ,पोलिस गजेंद्रला ओळखू शकत होते का ,या पातळ्यांवर हा तपास सुरू आहे.
‘थप्पड’प्रकरणी पोलीस विभागाने काही चौकशी सुरू केली आहे का, याबाबत पोलिस आयुक्त अजित पाटील यांना दूरध्वनीहून विचारणा केली. ते बैठकीत व्यग्र होते. पोलिस आयुक्त अजित पाटील यांची बदली आणि ठाणेदार अशोक धोत्रे यांचे निलंबन करा, अशी मागणी सत्ताधारी काँग्रेसने केली असली तरी खरेच या प्रकरणाला पोलिसच जबाबदार आहेत का, याचा तपास गुप्तचर यंत्रणा करीत आहे. दुसरीकडे अमरावतीचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणी विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्याची शिफारस मुख्यमंत्री आणि गृहविभागाकडे केली. मात्र, अद्यापही अशी समिती गठित करण्यात आलेली नाही. त्यामुळे काँग्रेसच्या या मागणीला राष्ट्रवादीतून विरोध असल्याचेच स्पष्ट होत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.