आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार ठाकूर यांचा ठिय्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी देण्याबाबत इंडिया बुल्स कंपनीने चालवलेल्या टोलवाटोलवीविरोधात आमदार यशोमती ठाकूर आणि प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात सोमवारी तीन तास ठिय्या दिला. संबंधितांना नोकर्‍या व नोकरीत असलेल्यांना तत्काळ ओळखपत्र देण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

अचानक झालेल्या आंदोलनामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाचे कामकाज प्रभावित झाले होते. सुमारे तीन तासांच्या चर्चेनंतर हा मुद्दा निस्तारला. विभागीय आयुक्त दत्तात्रेय बनसोड, इंडिया बुल्स मॅनेजमेंटचे मेहुल जॉन्सन, संचालक डॉ. शरद किनकर, सहायक महाव्यवस्थापक प्रवीण शंकर, गजेंद्र देशमुख या वेळी उपस्थित होते. कंपनीच्या या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, येत्या दोन महिन्यांत हा तिढा सुटणार आहे. तसे न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार ठाकूर यांनी दिला.

शेतकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून शेख मुन्ना, मोहम्मद मुख्तार, उमेश पेठे, प्रफुल्ल तायडे, मुमताज शेख, मोहम्मद शकील, माहुलीच्या सरपंच ज्योती ठाकरे, चेतन वाघमारे, राजेश जेवडे यांच्यासह माहुली जहागीर, डवरगाव, करजगाव आदी गावांतील नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.

प्रकल्पाने व्यापली 263 शेतकर्‍यांचा जमीन
पंचतारांकित एमआयडीसीमध्ये इंडिया बुल्सच्या वीजनिर्मिती कारखान्याने 263 शेतकर्‍यांची जमीन व्यापली आहे. कंपनीने यापूर्वी प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार अनेकांनी प्रशिक्षणही पूर्ण केले. मात्र, अद्यापही त्यांना नोकरी देण्यात आली नाही. शिवाय ज्या तरुणांना मिळाली, त्यांना अद्यापही कंपनीतर्फे ओळखपत्रे देण्यात आली नाहीत. त्यामुळे त्यांची ठिकठिकाणी अडवणूक होत आहे. यापुढे असे होणार नाही, असे या वेळी सांगण्यात आले.