आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवकाकडून चौघांनी लुटले साडेबारा लाख

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गुजरातवरून काम करण्यासाठी शहरात आलेल्या एका २३ वर्षीय युवकाकडून चार अज्ञात चोरट्यांनी कुरिअरची तब्बल १२ लाख ५५ हजारांची रक्कम लुटून नेली. ही घटना सोमवारी रात्री घडली असून, या प्रकरणी शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात युवकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२४ तासांनंतरही पोलिसांना आरोपींचा सुगावा लागला नाही. धारुजी पुताजी ठाकोर (२३, रा. देवरासन, गुजरात; ह. मु. केशर अपार्टमेंट, बडनेरा रोड, अमरावती) असे तक्रारदार युवकाचे नाव आहे. धारुजी हे रोजगाराच्या शोधात गुजरातवरून अमरावतीला आले. शहरात कुरिअरसाठी रक्कम गोळा करण्याचे काम ते करतात. सोमवारी (दि. २०) धारुजींनी शहरातील सात ते आठ व्यावसायिकांकडून कुरिअरमध्ये देण्यासाठी रक्कम गोळा केली. या वेळी १२ लाख ५५ हजार रुपये हिरव्या रंगाच्या बॅगमध्ये, तर काही रक्कम खिशात होती. गुलशन प्लाझा परिसरात धारुजी दुचाकीने (एम. एच. २७ बी.डी. २८०६) रक्कम घेऊन जात होते.
युवकाकडून चौघांनी लुटले साडेबारा लाख

त्या वेळी अनोळखी चार युवकांनी धारुजीच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे धारुजी दुचाकीसह खाली कोसळले. याचवेळी दुचाकीवर असलेली रोख रकमेची बॅग घेऊन चोरट्यांनी पळ काढला. झालेल्या प्रकाराबाबत त्यांनी आपल्या मित्रांना माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी येऊन चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे मिळाले नाहीत.
अखेर धारुजींनी मंगळवारी रात्री कोतवाली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी तीन ते चार अनोळखी युवकांविरुद्ध वाटमारीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूने असलेल्या दोन ठिकाणच्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले असता, यामध्ये चार लुटारू युवक दिसून येत आहेत. दोघे दुचाकीने, तर दोघे पळत जात असल्याचेही दिसत आहे. पोलिसांची शोध मोहीम सुरू आहे. मात्र, २४ तासांनंतर पोलिसांना त्यामध्ये यश आले नव्हते.