आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टल चोरट्यांच्या टोळीचा यवतमाळ येथे पर्दाफाश, एक आरोपी अजून फरारच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - यवतमाळ जिल्ह्यासह इतर अनेक ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या टोळीच्या दोन सदस्यांना अटक करण्यात आली. या चोरट्यांनी तब्बल बारा घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्या चोरट्यांकडून १८४ ग्रॅम सोने आणि अर्धा किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने पार पाडली.

शेख अक्तर शेख मुक्त्यार वय २४ वर्षे रा. वसंतनगर, पुसद आणि काल्या उर्फ जब्बार खान माजीद खान वय २६ वर्षे रा. मधुकरनगर, पुसद, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वर्षभरापूर्वी आर्णी येथील न्यायाधीश टी. टी. आगलावे यांच्या घरी चोरी करण्यात आली होती. त्या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शेख अन्वर उर्फ बाबू आणि शेख अकबर शेख मुसा या दोन आरोपींना अटक केली होती. चौकशीदरम्यान या दोन चोरट्यांनी त्यांचा साथीदार असलेला पुसद येथे राहणारा शेख अक्तर आणि अन्य एक आरोपी आदिलाबाद येथे लपून असल्याची माहिती दिली होती.
तेव्हापासून विशेष पथक या दोघांच्या मागावर होते. दरम्यान, त्या दोघांना आदिलाबाद पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या आदेशावरून आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाने त्या दोघांना ताब्यात घेतले.

त्या दोघांना यवतमाळात आणून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान त्यांनी एकट्या आर्णी परिसरात तब्बल बारा घरफोड्या केल्याची कबुली दिली. या चोरट्यांकडून तब्बल १८४ ग्रॅम सोने आणि ५०० ग्रॅम चांदी, असा सुमारे लाख ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना २० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

^गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चोरी आणि घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी आतापर्यंत केवळ आर्णी परिसरात केलेल्या १२ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे पुढील चौकशीत उघडकीस येतील, अशी शक्यता आहे. शिवाजीलष्करे, पोलिसनिरीक्षक, विशेष पथक

यवतमाळ पोलिस वर्षभरापासून होते मागावर
याप्रकरणात या आधीच विशेष पथकाने दोन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता पुन्हा दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही एक आंतरराज्यीय टोळी असून, त्यांनी मोठ्या प्रमाणात घरफोडी, चोरी अशा प्रकारचे गुन्हे केले असल्याचा संशय आहे. आर्णी येथे न्यायाधीशांच्या घरी झालेल्या चोरीच्या घटनेतील आरोपींच्या माहितीनुसार पोलिस वर्षभरापासून या टोळीच्या मागावर होते.
आदिलाबाद पोलिसांच्या मदतीने परभणीत आरोपींना अटक
वारंवार आदिलाबाद येथे जाऊन आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करणे शक्य नसल्याने विशेष पथकाने या आरोपीची माहिती आदिलाबाद पोलिसांना दिली. त्यावरून आदिलाबाद पोलिसांनी या आरोपीचा शोध सुरू केला. त्यात प्रथम काल्या उर्फ जब्बार खान याला त्याच्या घरातून अटक केली. त्यानंतर त्याच्याकडून शेख अक्तर याची माहिती घेऊन परभणी येथून त्यालाही अटक करण्यात आली. त्यांनी आदिलाबाद येथे केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली आदिलाबाद पोलिसांपुढे दिली.