आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Motion Of No Confidence For Municipal President In Amravati

मोर्शीच्या नगराध्यक्षांविरुद्ध अविश्वास दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती मोर्शी - मोर्शीच्या नगराध्यक्ष शीला रोडे यांच्याविरुद्ध तब्बल 15 नगरसेवकांनी अविश्वास दर्शवला असून त्यांच्या स्वाक्षरीचे पत्र मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांना सादर केले. अचानक झालेल्या या घडामोडीमुळे रोडे दाम्पत्याच्या अडचणी वाढल्या आहेत. सभापती असलेल्या शीला रोडे यांचे पती अशोक रोडे यांच्याविरुद्ध यापूर्वीच एक खटला दाखल झाला. त्याद्वारे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शीला रोडे यांच्या कारकिर्दीत शहराचा विकास खुंटला. रस्ते, साफसफाई, सार्वजनिक दिवाबत्ती व इतर कामे पूर्णत: थांबली. परिणामी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून त्यांना तोंड देणे कठीण झाले आहे, असे नगरसेवकांच्या पत्रात म्हटले आहे. 19 सदस्यीय नगरपालिकेतील 15 सदस्यांनी ही भूमिका घेतल्याने मोश्रीच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 च्या कलम 55 (3) अन्वये जिल्हाधिकार्‍यांनी त्वरेने सभा बोलवावी, अशी मागणीही या पत्रातून करण्यात आली आहे. दरम्यान, सर्व नगरसेवक त्यांच्या भूमिकेवर कायम राहिल्यास शीला रोडे यांच्यावरील अविश्वास सहज पारित होऊ शकतो, असे विधिज्ञांचे म्हणणे आहे. काँग्रेसची पार्श्वभूमी असलेल्या रोडे यांनी गेली निवडणूक अपक्ष लढवली होती. नंतर आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानची साथ घेऊन त्यांनी सत्ता स्थापन केली. घडामोडीमुळे ही एकमेव सत्ताही अडचणीत आली आहे.

चांदुरात ‘प्रहार’ धक्क्यातून सावरली
चांदूरबाजार : नगरपरिषदेतील सत्तापक्षाचे (प्रहार) नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी दिलेला राजीनामा मंगळवारी परत घेतला. 5 सप्टेंबर रोजी त्यांनी एका पत्राद्वारे जिल्हाधिकार्‍यांना राजीनामा सादर केला होता. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांच्या पत्रात म्हटले होते. त्या पत्रावर तारीख नव्हती. त्यामुळे (तांत्रिक चुकीमुळे) तसेही ते पत्र मंजूर केले गेले नसते.

18, 19 ला होणार मतदानाची बैठक
अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील हालचालींना वेग आला आहे. पत्र प्राप्त झाल्याच्या दहा दिवसांत बैठक आयोजित करणे भाग असल्याने 18 किंवा 19 सप्टेंबरला मतदानाची बैठक घेतली जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मोश्री येथील एसडीओंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल.

अशोक रोडे प्रकरणाची सुनावणी 17 ला
रोडे हेदेखील मोश्री नगरपालिकेत सभापती आहेत. अपत्यांबद्दलची माहिती लपवल्याप्रकरणी माजी उपाध्यक्ष तथा जनसंग्रामचे जितेंद्र ऊर्फ आप्पा गेडाम यांनी यापूर्वीच त्यांच्याविरुद्ध याचिका दाखल केली. आज या प्रकरणाची सुनावणी होती. मात्र, त्यांच्या वकिलाने वेळ मागितल्याने पुढील सुनावणी 17 सप्टेंबरला घेण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी दिला आहे.

कोण आहेत तक्रारकर्ते?
अविश्वास प्रस्ताव दाखल करणार्‍यांमध्ये प्रभाग एक व दोन मधील प्रत्येकी चार, प्रभाग चारमधील तीन आणि तीन व पाचमधील प्रत्येकी दोन नगरसेवकांचा समावेश आहे. रेशमा उमाळे, सुनील ढोले, प्रभा फंदे, ज्योतिप्रसाद मालवीय, शांताबाई महल्ले, विद्याताई ढवळे, मोहन मडघे, डॉ. प्रदीप कुर्‍हाडे, वंदना बोरकर, फरजानबी हैदरशा, कमलताई बदुकले, संजय आगरकर, सुनीता कुमरे, प्रीती देशमुख व महादेव वाघमारे अशी या नगरसेवकांची नावे आहेत.