आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटीच्या दुर्दशेचे ‘दशा’वतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - संपूर्ण राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा ‘कणा’ असलेली एसटीच्या अव्यवस्थापनामुळे प्रवाशांची आबाळ होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने शुक्रवारी अमरावती बस आगारातील एसटी गाड्यांचे वास्तव आणि त्याला कारणीभूत घटकांचा आढावा घेतला असता, दुर्दैवाचे ‘दशा’वतार संपण्याची चिन्हे नसल्याचेच यातून स्पष्ट झाले. महामंडळाचे अधिकारी, चालक, वाहक यांच्याशी चर्चा केल्यावर एसटीच्या प्रमुख दहा समस्या त्यांनी ‘दिव्य मराठी’ कडे मांडल्या.

परतवाडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर एसटीच्या दुर्दशेचे अनेक ‘अवतार’ आता उघड होत आहेत. आठ ते बारा तास बस चालवणार्‍या चालकांना कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने त्यांच्यावरील ताण वाढत आहे. चालकाच्या केबिनमध्ये कोणत्याही सुविधा नाहीत. अनेक बसमधील चालकांच्या आसनाची दुरवस्था झाली आहे. इतकेच काय, तर चालकाच्या केबिनमध्ये अग्निशमन व्यवस्था नसल्याचे ‘दिव्य मराठी’ने केलेल्या पाहणीत आढळून आले आहे. याबाबत अनेक चालकांनी आपल्या व्यथा मांडल्या असून, असेच दुर्लक्ष राहिले तर यापुढील काळात जिवावर उदार होऊन गाड्या न चालवण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.अमरावती आगारात 71 बस आहेत. त्यांपैकी 26 बस या लांब पल्ल्यावर चालतात. लांब पल्ल्यावर चालणार्‍या बस या तीन लाख किमीपेक्षा कमी अंतर चाललेल्या असणे आवश्यक आहेत. असे असतानाही अमरावती आगारात केवळ 18 बस या केवळ तीन लाख किमी पेक्षा कमी चाललेल्या आहेत. त्यामुळे उर्वरित आठ बसेस र्मयादेमध्ये न बसताही लांब पल्ल्यावर चालवल्या जात आहेत.

सुरक्षिततेचे नियम धाब्यावर : चालकांच्या केबिनमध्ये सुरक्षिततेचे सारे नियम धाब्यावर बसवले जात असून, काही गाड्यांमध्ये चालकाच्या आसनाची दुरवस्था झाली आहे.


भंगार बसमध्ये सुधारणा करा
एसटी बसच्या दयनीय अवस्थेचे पडसाद शुक्रवारी (दि. 27) जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. भंगार झालेल्या बसची स्थिती सुधारावी, असा ठराव सर्वमताने मंजूर करण्यात आला. खुद्द जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी हा ठराव सभेत मांडला. स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी या ठरावाला पाठिंबा देऊन एसटी बसमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी केली.

परतवाडा मार्गावर झालेल्या एसटी बसच्या अपघातानंतर ठाकरे यांनी चिखलदरा मार्गावर जाणार्‍या काही बसची परतवाडा आगारात पाहणी केली. यात त्यांना अनेक त्रुटी आढळून आल्या. स्थायी समितीच्या सभेत बोलताना त्या म्हणाल्या, मेळघाटात जाणार्‍या बस गाड्यांचीही भयानक अवस्था आहे. प्रवाशांसह मोठय़ा प्रमाणात शाळकरी विद्यार्थी यामधून प्रवास करतात. खराब गाड्यांमुळे अपघात घडू शकतो. त्यामुळे एसटीची ही अवस्था सुधारणे आवश्यक आहे. सुधीर सूर्यवंशी यांनी रस्त्यावरील खड्डय़ांमुळे एसटीचा टायर फुटून अपघात झाल्याचे सांगत बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

बांधकाम विभागाने रस्त्यावर ‘पॅचेस’ लावण्यासाठी 25 लाख रुपये खर्च केलेत; तरीही खड्डे कायम असल्याचे सूर्यवंशी म्हणाले. बस चालवण्यायोग्य नसल्यामुळे ती आगाराच्या बाहेर काढण्यास चालकाने नकार दिला होता. परंतु, वरिष्ठांनी बळजबरीने ती बस बाहेर काढण्यास सांगितल्याने हा अपघात झाल्याचे रवि मुंदे यांनी या प्रसंगी बोलताना स्पष्ट केले.

यांत्रिकी कामगारांच्या कमतरतेमुळे येतात अडचणी
यांत्रिकी विभागात 75 पदे मंजूर असताना 53 कर्मचारीच कार्यरत आहेत. 22 पदे रिक्त असल्यामुळे बसच्या मेंटेनन्सवर परिणाम होतो. प्रत्येक बसची फेरी संपवून आल्यानंतर तपासणी केली जाते. त्यामुळे दोष असलेल्या बस मार्गावर जात नाहीत. टायरच्या बाबतीतसुद्धा आम्ही दक्ष असतो. रस्ते खराब असल्याने त्याचा फटका टायरला बसतो. 39 बसमध्ये ज्ॉक नाहीत. त्या प्रकरणी आम्ही संबंधितांवर कारवाई करणार आहोत. आरटीओमध्ये बस पासिंग योग्य पद्धतीने झाल्यास अडचणी कमी होतील. नीलेश बेलसरे, आगार व्यवस्थापक, अमरावती.